शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२

अंतरीच्या वादळाने
मन सुटं सुटं केले
तुझ्या मायेच्या हातांनी
त्याला सावरून धरले.

नव्हता आधार कुणाचा
निजेचा बाजही वेगळा
मायेने आणले जगात
बाप मात्र नामानिराळा.

जात तिच्याच पदराची
भोळा [?]समाज विचारे
वाटा तिच्याच कर्तृत्वाचा
मग ओरबाडू पाहे.

आता इतुकेच ठावे
जगायाचे हमखास
पुन्हा एकदा करायची
या जगासोबत उठबस.
............अस्मित

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२




माझी जपान सफर - ४
आम्हाला ज्या हॉटेल मध्ये राहायला खोली दिली होती ते बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशन पासून १-२ मिनटांच्या अंतरावर आहे.
पण जपानी माणसाच्या गाडीचे हॉर्न्स अजिबात न वापरण्याच्या सवयी मुळे आणि रूम व्यवस्थित साउंड प्रूफ असल्याने मला आवाजाचा त्रास अजिबात जाणवत नाही.
खरेतर इथे आवाजाचा कसला त्रासच नाही. येथील लोक चुकून किंवा टाइमपास म्हणून देखील हॉर्न वाजवत नाही. आवाज फक्त आला तर ambulance चा
[नोट :  आपल्याकडील लोकांनी जपान मध्ये गाडी चालवण्या आधी विचार करावा...जपान कि हॉर्न?]
सगळीकडे रस्त्याने पाट्या वाचता येतील अश्या लावलेल्या. कुठेही रस्त्यात कागद, कचरा अथवा झाडाची पाने सुद्धा पडलेली दिसत नाहीत.
परंतु त्यांच्या एवढ्या स्वच्छतेमुळे बिचारे पाऊस पडल्यावर येणारा "मातीचा सुगंध" काय आणि कसा असतो या स्वर्गीय अनुभवला मुकले [आम्ही भारतीय सुदैवी, कारण आमच्या पायाला अजूनही माती आहे :) ]
इथला पाऊसही मजेशीर आहे. बिचारा दिवसभर पडतो पण कोसळणाऱ्या पावसाचे सुख देत नाही. तोही जपानी माणसा सारखा पद्धतशीर. या पावसात भिजण्याचा खरा आनंद नाही :(
पाऊस कसा मस्त कोसळणारा आणि सगळी मरगळ उतरवून कांदा भजी आणि अर्धा चहाची तल्लफ जागवणारा हवा, तेहि कळकुटट टपरी आणि फुटका रेडियो सोबतच.
इकडच्या हॉटेल मधील रूम खूपच छोट्या असतात. म्हणजे त्या जपानी लोकांच्या दृष्टीने स्टॅंडर्ड असल्या तरी आपल्यासाठी न्हाणीघरा एवढ्याच असतात.
आमच्या ऑफीस लोकांनी आम्हाला वेलकम पार्टी दिली. आम्ही आधीच सांगितले होते कि आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत त्यामुळे आम्ही एका भारतीय रेस्टोरेंट मध्ये जेवायला गेलो.
[जपान मधील लोकांना शाकाहारी म्हणजे की हेच मुळी माहित नाही, त्यामुळे पूर्ण शाकाहारी दूरच राहिला :)]ते रेस्टोरेंट अर्धे भारतीय अर्धे जपानी आहे, सगळे जेवण नुसते गोड.एकही पदार्थाला झणझणीत चव नाही. पण जपानी लोक सोबत असल्याने त्यांच्या सोयीनुसार जेवण मागवले.जपानी लोक भारतीय जेवण आवडीने खातात. त्यांच्यासाठी ते जेवण तिखटच असते, तरी खूप सारे लोक सुट्टीच्या दिवशी वगैरे येथे येऊन भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात.[जपान मध्ये खूप सारी भारतीय रेस्टोरेंट आहेत. ]
आम्ही ज्या रेस्टोरेंटमध्ये जेवलो तेथील लोक खूपच चांगले होते. सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत होते. आम्ही ऑर्डर देत असताना त्याने जपानी लोकांना आधी सांगून ठेवले कि तुम्ही ऑर्डर केलेले खूप जास्त होईल, नीट विचार करून मागवा, तरीही जे ह्वायचे ते झाले.या लोकांनी निम्म्याहून जास्त जेवण वाया घालवले. :( असो...
ऑफीस मध्ये पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणात खूप गम्मत झाली. आमच्या साठी शाकाहारी जेवण शोधता शोधता धावपळ करावी लागली. शेवटी ऑफीस बाहेर मोबाईल गाडी मधून मिळणार एशिअन करी "ग्रीन करी" [भात आणि आमटी] घेतला, जपानी चिकट भात आणि आल्याची आमटी असा जेवण घेतल्यावर उद्यापासून घरूनच डब्बा न्यायचे मनाशी पक्के केले.
इकडे ब्रेड आणि केक चे असंख्य वेगळे प्रकार पाहायला मिळतात. आणि ते खरेच खूप छान लागतात. यांच्या कडील साखर आपला सारखी गोड नसते. त्यामुळे इकडचे गोड पदार्थ आपल्या सारखे तसे गोड नसतात.
दुकानातून सगळे पदार्थ खूप सुंदर सजवले असतात. अगदी मांस मच्छी न खाणार्याला हि मोह होऊ शकतो घ्यायचा.
इकडचा माणूस नकाशात जगतो असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कुठेही जा हातात नकाशा असणारच [आता आय फोन ]. कोणावरही अवलंबून राहायचे नाही. बाहेरून आलेल्या लोकांना स्वखर्चाने नकाशाची प्रिंट काढून देणार आणि कसे जायचे ते पद्धतशिरपणे आणि अगदी किती वेळ लागेल सगळ सांगणार. बाहेरील माणसाला झालेला त्रास त्यांना पाहवत नाही आणि कोणाला त्रास देववत नाही.
जपान मध्ये शेत जमीन खूप कमी, त्या मुळे शेतीच्या बाबतीत भरपूर संशोधन करून या लोकांनी हायब्रीड पिके बाजारात आणलीत. भले थोरले मुळा, कांदे,बटाटे,सफरचंद पाहून त्यांची कीव करावी कि कौतुक कळत नाही.
..........................................................अस्मित [१९  ऑक्टो २०१२ जपान]

माझ्या मातीची भूल
पडे त्या ईश्वराला,
गंध मधाळ कस्तुर
कणा कणात विसावला
.........................................: अस्मित






माझी जपान सफर - ३

शेवटी एकदाच मी ७ ऑक्टो ला सकाळी ११:३० ला जपानला पोहोचले. माझी कानागावा ला जाण्याची बस २ तासाने होती आणि टोकियो पासून २ तासाचा बस प्रवास होता.
एरपोर्टवर २ तास काढायचे होते. जपान हे शहर काय आहे याची कल्पना यायला वेळ लागला नाही.अप्रतिम स्वच्छ, सगळे व्यवहार शांत कानी काटेकोर पणे.
कुठेही चिडचिड, वैताग नाही. अडल्यास कोणालाही मदत मागावी, अगदी स्वतः ची कामे सोडून रस्ता दाखवायला आपल्या स
ोबत येणार.
कमालीचे ऑटोमायज़ेशन.खरेच खूप कौतुक वाटते या राखेतून वर आलेल्या देशाचे.
बस मधून जाताना टोकियो चे दर्शन घेत आम्ही एकदाचे कानागावाला पोहोचलो तेव्हां संध्याकाळचे ४ झाले होते.या लोकांनी त्यांची टेक्नॉलॉजी एवढी जबरदस्त विकसित केली आहे
कि आपण हॅरी पॉटर च्या राज्यात आल्यासारखे वाटते. सगळ्या बस, रेल्वे एअरकन्डीशण्ड, सगळे नियम ठरलेले आणि पाळले जाणारे. रस्ता ओलांडताना, बस रेल्वेत चढताना, दुकानातून
सगळे जन रांगेत उभे राहतात (नशीब अमिताभ इथे जन्माला नाही, बिचारा रांगेत उभे राहावेच लागले असते त्याला :P). रात्री ३ ला जरी रस्ता ओलांडायचा असेल तरी सिग्नल पडायची वाट पाहत रांगेत उभे राहणार.
रस्ता झेब्रा क्रोस्सिंग वरूनच ओलांडणार.
इथे धूळ, चिखल, कचऱ्याचा सुगंध(?), रस्त्यावर भटकणारी कुत्री मांजरी, गायी म्हशी रस्त्यात चरत बसलेल्या इतकच काय पण शेताच्या कडेला कोणी टमरेल घेऊन बसलेला असल काही अनुभवला मिळत नाही.
कचरा टाकण्याचे नियम आणि दिवस ठरलेले. ऑफिस मध्ये पण तसच, कचरा टाकायला एक वेगळी रूम;आणि ती पण दुर्गंधी विरहित. प्लास्टिक,कागद,बाटल्या,कॅन्स, पेपर सगळ्या साठी वेगळ्या कचरा पेट्या.
बाथरूम मधीलच पाणी पिण्या इतपत चांगले.कुठेही कसले घाण वास नाही. बहुतेक सगळ्या घरांभोवती छोटी पण आखीवरेखीव बाग. पण पक्षी दर्शन मात्र कमीच.
इथे लोक मॉल्स मधून पाळीव प्राणी विकत घेताना दिसतात. ती कुत्री,मांजरे दिसायला क्यूट असतात पण जिवंत पणाचा अनुभव येत नाही. नुसतीच फरची खेळणी चावी दिल्या सारखी वाटतात.
इथल्या फॅशन बद्दल बोलावे तेवढे कमीच. अमेरिकन संस्कृतीचा खूप पगडा. इथे डोळ्याच्या पापण्यासाठी वेगळे ब्युटीपार्लर्स पाहून थक्क झाले.इथल्या मुलींना पापण्या रंगवणे, खोटी नखे लावून ती सजवून घेणे याचे खूप वेड आहे. सामान्यत: सगळ्या मुली रोजच खूप नट्टा पट्टा करून आणि एकदम तोकडे कपडे (भर थंडीतही) वापरणाऱ्या आहेत.
इथे लोक एकमेकांशी खूपच कमी संवाद साधताना दिसतात. सगळे सतत हातात मोबाईल, पुस्तक नाहीतर गाणी ऐकण्याची साधने घेऊन असतो. मग ते बस साठी वाट पाहत असोत, अथवा सायकल चालवत असोत, त्यांचे मोबाईल प्रेम काही कमी होत नाही.
...............................................................अस्मित [१८ ऑक्टो २०१२ जपान]

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२




माझी जपान सफर - २
सृष्टी मध्ये बहु लोक, परिभ्रमणे काळे कौतुक - समर्थ [पु.ल. च्या पूर्वरंग पुस्तकातून साभार]
इतके वर्ष नुसत विचारातून पाहिलेला, हिंडलेला देश पाहायला मी जाणार होते.
आधी महिनाभर नुसत जाणार कि नाही यावरून हृदयाचे ठोके ऑलिम्पिक मध्ये धावल्या सारखे होते होते, आणि खरेच जायची वेळ आली तेव्हां अतिहर्षाने
आपण विमानाऐवजी स्वत:च उडून जातोय कि काय असे वाटू लागले.
असो..तर एकदाची जाण्याची वेळ, तारीख ठरले. मी(?) प्रवासाला(?) (ते हि एवढ्या लांबच्या :P) निघणार म्हणल्यावर सगळ्यांना सत्रांदा फोनाफोनी करून मी जातेय, बॅग कोणती आणि कितीची घेऊ, काय काय समान घेऊन जाऊ, तिकडे थंडी असेल कि पाऊस, विमानाची वेळ, बॅगेचे वजन इ. इ. सगळे करून झाले.
माझ्या वैद्यांनी पण तीन महिन्यांची औषधे देऊन माझ्या बॅगेचे आणि स्वतःच्या खिशाचे वजन थोडे आणखीन वाढवले.
सरते शेवटी जाण्याची वेळ झाली आणि घरापासून विमानतळा पर्यंत पोहोचवणारी (दोन्ही अर्थाने पोहोचवणारी, कारण चेन्नई मधील सगळे ड्राईव्हर F1  मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत ) कॅब आलीच नाही आणि मी अजूनही भारत देशात असल्याचे तत्काळ ज्ञान त्यांनी मला करून दिले.
मग त्यांच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार करत आम्ही आपल्या ३ चाकीने म्हणजे रिक्षाने निघालो.विमानतळावरील सगळे सोपस्कार आटोपून आमचे श्रीलंकेचे विमान चक्क वेळे आधी उडाले. रावण वधा नंतर भारतीय लोकांचा त्यांनी धसका घेतला असावा बहुतेक. भारताचा राष्ट्रीय पक्षी विमान सुंदरींच्या साडीवर दिमाखाने मिरवत होता आणि चेहऱ्यावर गोड हसू ठेवून "Ayubowan!" ("अयुबोवन" (सिंघाली भाषेत अर्थ "भरपूर वर्ष जागा") अस म्हणत सगळ्यांचे स्वागत करत होत्या. आता विमानाने प्रवास करत असताना "भरपूर वर्ष जागा" अस म्हणून स्वागत करण्यामागचे कारण मला समजले नाही.कदाचिद आपल्या बंधू भावांच्या विमाने उडवण्याच्या खेळाचा त्यांना खूप आदर असावा.असो..
श्रीलंकेत कोलोम्बो ला उतरलो. तेथून टोकियो ला जाणार्‍या दुसर्‍या विमानात बसायचे होते. श्रीलंकेचा विमानतळ खूपच सुंदर आहे. तिथे गौतम बुद्धाची मोठी आणि छान मूर्ती आहे. १ तासाने टोकियो च्या विमानात बसलो. माझ्या शेजारी ३ जपानी स्त्रिया होत्या, त्यातील दोघीजणी विमान सुरु होण्याआधीच कुठे गेल्या त्या परत आल्याच नाहीत. रात्रीचे ११:३० झाले होते, मग मी आणि ती उरलेली जपानी बाई चक्क शेजारील सीट वर पाय पसरून भारतीय रेल्वेत असल्यासारखं आडवे होऊन झोपून गेलो ते थेट सकाळीच उठलो. कुठेहि जा मला आपण भारतीय असल्याचा पूर्ण अभिमान आहे.
..................................अस्मित [१७ ऑक्टो २०१२ जपान]
माझी जपान सफर-१

झाले....एकदाचे स्वप्न साकार झाले....
कोणते...????
अहो हेच की....उगवत्या सूर्याच्या देशात येण्याचे...."जपान" ला येण्याचे स्वप्न.
अगदी लहापणापासून (म्हणजे नक्की कधी पासून माहित नाही :) ) जपान बद्दल आकर्षण होते.
कदाचिद दर रविवारी दूरदर्शनवर लागणाऱ्या "रंगोली" या कार्यक्रमामध्ये लागणाऱ्या "सायोनारा सायोनारा" किंवा "ले गायी दिल गुडिया जपान कि" या गाण्यांमध्ये
त्याचे मूळ लपलेले असणार...:)
पण इतके वर्षांच्या प्रतीक्षा नि तपश्चर्येनंतर माझ पाऊल एकदाच जपान मध्ये पडले.
इथे येण्याधीची उत्सुकता, थोड टेन्शन, आपला कसे होईल तिथे...अशी वाटणारी काळजी (मला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा :) )सगळे काही भरून पावल्या सारखे झाले.
कॉलेजमध्ये शिकत असताना जपानशी थोडातरी संबंध यावा म्हणून मुद्दाम "Total Quality Management" हा विषय स्पे. म्हणून निवडला.
आमच्या बॅचमुळे हा विषय कॉलेजमध्ये सुरु करावा लागला, आणि श्री. देव सरांच्या कृपेमुळे जपान आणि त्यांचे Quality प्रेम खूप चांगले शिकायला मिळाले.
 काय आहे असे जपान कडे कि बरेच लोक त्या देशाकडे आकर्षित होतात....त्यांची टेक्नोलॉजी,क्वालिटी वर्क, क्रिएटिविटी,हॉस्पिटालिटी, निसर्गप्रेम......आणखीन बरेच काही...सगळेच ग्रेट.
खरेतर पु.ल. देशपांडे आजोबांनी त्यांच्या लिखाणातून या देशाबद्दलचे प्रेम अजूनच वाढवले. त्यांना भावलेला जपान खरोखर तसाच आहे.....खूप गोड माणसे आणि तसेच गोड आदरातिथ्य...

सध्या इथे ऑटम सिझन आहे.आपल्यासाठी थंडी वाटत असली तरी जपानी माणूस या ऋतूची खूप आतुरतेने वाट पाहतो.  नोव्हेंबर पासून इथे झाडाची पाने लाल किंवा गोल्डन येलो रंगाची होतात.
सगळा निसर्ग रंगात न्हावून निघतो.आम्ही इथे आल्यावर सगळ्या जपानी माणसांची हीच प्रतिक्रिया होती कि आम्ही अगदी योग्य वेळी जपानला आलो :)
चला...उशिरा का होईना पण कोणाला हातपाय न पडता, चापलुसी न करता (न शिक्षकांची, न मॅनेजरची) स्वकष्टाने आणि मित्रमंडळाच्या सहकार्याने, घरच्यांच्या पाठबळाने आणि परमेश्वराच्या कृपार्शिवादाने
येथवर येऊन पोहोचले.आता मागे वळून गेले ६ वर्षांचा आढावा घेतला तर सगळे कष्ट, दुख: सगळ भरून पावल्याचे समाधान मिळते .काही लोकांनी मित्र म्हणून केलेली फसवणूक, आजारी असताना पण ऑफीसमध्ये करायला लावलेली कामे इ. , सगळ काही पाउस पडून गेल्यावर आकाश आणि धरणी स्वच्छ करत तसेच वाटल.
मी जपानला जाणार हे ऐकल्यावर लोकांना झालेला आनंद आणि काहीना झालेली इर्षा, काहींचे आरोप कि मी बदलले, गर्व चढला आणि तर काहींना वाटणारे संशयमिश्रित आश्चर्य....सगळ तेवढ्याच नम्रतेने स्वीकारलं.
कारण ज्यांनी माझे कष्ट पहिले त्यांना माझ्या यशात आणि आनंदात सहभाग घेतला, उरलेल्या इतरांना माझ्या आयुष्यात फार काही स्थान नाही; मग त्यांना काय वाटते याचा कोणाला फरक पडतोय.
मी आनंदी आहे, सुखात आहे. अजून काय सुख हवे?

.....................................................................अस्मित (16th Oct Japan)
To be conti.......

फेसबुक ने सारे जग जवळ आणले

फेसबुक ने सारे जग जवळ आणले
म्हातारे चेहरे षोडशवर्षीय झाले.
स्वातंत्र्याचा खरा अर्थ स्वैराचार झाला.
वान्ग्मय चौर्‍याने खर्या कवींना फासावर लटकवला.
आजोबांना आता "नमस्कार आजोबा" नको वाटू लागल,
"हाय / हेलो डियर"ने संभाषण सुरू झाल.
प्रत्येकजण इथे दुसर्याला "स्वतःची"काळजी घ्यायला सांगत,
खरे सांगा, इथे कोण "दुसर्‍याची" चिंता वाहत.......?
बायकांचे कमी वय अजुनच कमी झाले,
बेडरूममधील हितगुज भिंतीवर आले.

आता सगळे जणफक्त एकच काम करू
दिवसातून एक मिनिट तरी घरच्यांसाठी बोलू.
......................................................................अस्मित [जपान मधून पहिली कविता :)]