बुधवार, ३० मे, २०१२



कसे जन्मलो / कसे परत चाललो /
दैवाच्या हातचे प्यादे बनून राहिलो//

न मागितले देणे / न कधी नवस फेडले /
देवळाच्या दारी बाजार भावनांचा चाले //

देवा तुझी हि करणी / मना शाश्वत न केले /
कमळाच्या पाकळ्यात भ्रमरा घर कि हो दिले //

दरवेळी हेच घडे / मुका प्राणही गमावे /
अबीर गुलालाने येथे मळवट भरलेले //

मी पाही साऱ्याकडे / असा तिह्राइतपने /
माझ्याच लेखणीत चंद्रप्रकाशाचे सडे //

******************

सौजन्य :-
छायाचित्र : श्री.अमोल लोखंडे सर
छायाचित्रातील व्यक्ती : श्री.सुहास नाडगौडाजी
कवियत्री : अस्मित

माझ्या आजीच घर

माझ्या आजीच घर दोन माड्यांच,
बालपणाने जिथं जीवन अनुभवायच.

माझ्या आजीची तुळस रामप्रहरी नटलेली
दिवा उदबत्तीने तिची नजर उतरवलेली.

माझ्या आजीच्या गळ्यात कोकीळ वसलेला
साखरझोपेतून मग श्रीरंग उठलेला

माझ्या आजीचा पहिला घास गाईला
अमृताची चव तीच्या दूध तूप सायीला

माझ्या आजीच्या गवळणी दिवाळी पाडव्याला सजलेल्या
गोवर्धन उभा, पेँद्या मात्र नीजलेलाच

माझ्या आजीच्या गोधडीत आठवणी विणलेल्या
अहेवपण देऊन माझ बालपण हिरावून गेलेल्या
-अस्मित




I am in LOVE


आम्ही रोज भेटतो...
न चुकता एकमेकांशी गुजगोष्टी करतो.
प्रत्येकवेळेस काही सांगायचे असतेच असे नाही,
कदाचित जाणून घ्यायचे असते त्याच्याबद्दल बरेच काही...

कामात असला की तो हळूच ढगाआड लपतो
मी मात्र वाट पाहत समुद्रकिनारा गाठलेला असतो....

उचलून घेतो मग तो परत त्याच आवेगाने समुद्राला
त्याच्या उशिरा येण्याची सगळी कारणे मग खरीच वाटतात मनाला....

त्याच्या अमावस्येसारखा मलाही शाप अबोल्याचा
सोडून जाईल कुठे तो...???? त्याला उ:शाप शीतलतेचा......

अजूनही समजले नाही, त्याच शांत विचारी रूप खर की आवेगाने उत्कट होण....????
माझे पाय सदैव जमिनीवर
त्याच पूर्वेला मावळन...............
                                                   :- अस्मित





रोज मी नव्याने मरते
कारण मला जन्मायला "तू"
एवढेच "कारण" पुरते...!!!!
-अस्मित.

जन्म आणि मृत्यू, खेळ सारे खेळले.......
सरणावर असताना, जगण्याचे राग आळवले...!!
-अस्मित.

मीटिंग बाय द रिवर.


वाट पाहिली तुझी कोजागीरीच्या राती
जिथे नदीकिनारी सावल्यांचे हात हाती
वसाविला होता जिथे वचनांचा गाव
नजरांचे खेळ घेत अंतरीचा ठाव

       तू नाहिसच आली
       सांजसांध्येने साथ दिली
       उघडून कवाडे मनाची
       गुपितांनी तिची ओंजळ भरली

तिच्या गालांच्या रक्तिमाने तेव्हां सृष्टी सारी रंगली होती
कातरवेळ पण सूर्याच्या बाहूपाशात विरली होती
मीही फिरलो मागे अडवून अश्रूंचे कढ
म्हणालो " हे तर खुळे स्वप्न, इथे आत्म्याशिवाय सोबत कोण?"

:- अस्मित


[या कवितेचा नाव इंग्लीश असण्याचे कारण,
काल सकाळी ज़ी टीवी वरील "आइडिया जलसा" कार्यक्रमामधे
पंडित विश्वमोहन भट यांचे मोहन-वीणा वादन होते, त्यात त्यांनी "अ मीटिंग बाइ द रिवर" -कूडर आणि विश्वामोहन भट्ट या आल्बम मधील एक धून पेश केली होती.
कवितेला हे नाव समर्पक वाटले म्हणून.............
अश्याप्रकारे माझा बॅंगलुर मधील शेवटचा रविवार मस्त गेला.]






प्रत्येक हृदयाची एक कहाणी...आपल्यासारखीच
प्रत्येक ओठांवर तीच गाणी...आपल्यासारखीच
प्रत्येक नजर तेच बोलणारी...आपल्यासारखीच
प्रत्येक भाषा तेच सांगणारी...आपल्यासारखीच
- अस्मित