गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२

माझी जपान सफर -११

नमस्कार मित्रहो, म्हणजे मैत्रिणी पण......
बोला...कसे आहात सगळे जण?


मी मस्त सुखात आहे. 


कामाचा व्याप आणि लोकांचा त्रास दोन्ही एकदमच वाढल्याने माझे लिहिण्याकडे काही दिवस दुर्लक्ष झाले.
तसेही रोज उठून लिहलेच पाहिजे असा काही नियम नाही.....चांगला असत अधेमधे थोड थांबून स्वतःच्या आणि इतरांच्या साहित्याचा आस्वाद घेतलेलं....नाही का?


तर आज आपण योकोहामा शहरातील हाक्केजिमा  मध्ये असणाऱ्या "सी पॅरडाइस"च्या सफारीला जाऊ.......अहो थांबा जरा....जेवणाची पिशवी सोबत घेऊ सोबत. ते आधी महत्वाचे...बाकी सगळे नंतर.


तर नेहमी प्रमाणे मी आणि माझी मैत्रीण ४ वेगवेगळ्या ट्रेन ने प्रवास करत एकदाचे पोहोचलो.
हाक्केजिमा हे एक मानवनिर्मित बंदर आहे.येथे ३ मोठी मत्स्यसंग्रहालये आहेत.५०० वेगवेगळ्या जाती आणि  समुद्रातील १००००० प्राणी आहेत. बेटावर बर्फाचे घर, अम्यूज़्मेंट पार्क, हॉटेल्स, शॉपिंग मॉल आहेत.
मत्स्यसंग्रहालय+डॉल्फिन शो+फुरेई लगून या ३ गोष्टी पाहायला २७०० येन असा खर्च येतो. निसर्गाकडे असणारा आणि समुद्राच्या पोटात दडवलेला तो खजिना खरेच एक अद्भुत नगरीत आल्याचा अनुभव देतो. आपल्या कल्पनेपलीकडील ते सुंदर प्राणी, त्यांच्या चपळ हालचाली एकदम थक्क करून सोडणारे आहे. फाइंडिंग नीमो या सिनेमा मध्ये दाखवलेले सगळे प्राणी खरे अस्तित्वात आहेत हे पाहून सिनेमा बनविणाऱ्या लोकांना, त्यांच्या अभ्यासू वृत्तीला मनातल्या मनात सलाम केला.निमोला भेटल्याचा आनंद तर  झालाच, सोबत ती मोठाली कासवे पण अद्भुत होती.स्टिंग रे,स्टार फिश,पाणघोडे इतके असंख्य प्रकार आहेत कि काय पाहू, काय नको होऊ गेल होत. जेली फिशचे वर्णन करणेच अवघड. कुठे तोंड, कशी शरीर रचना काही कळत  नाही. मस्त मऊ लुसलुशीत काहीतरी पाण्यात हिंडत आहे असे वाटते. त्यात सुद्धा बरेच प्रकार, एक पांढरा, तर दुसरा गुलाबी, काहींना सगळीकडे लाईट तर काही नुसतेच माथ्यावर सूर्यबिंदू घेऊन मिरवत असलेले.
काही माशांचे रंग तर असे होते कि नीट  पहिल्याशिवाय कळणारच  नाही, कि मासा आहे कि दगड. 

फुग्या सारख तोंड असणारे, फुग्याचे शरीर असणारे, तर काही साळी सारखे अंगावर काटे असणारे मासे , पोलर बेअर, पेंग्विन, पांढरे स्टार फिशसगळेच मस्त मस्त मस्त....३-४ फुट मोठे खेकडे पाहून तर विश्वासच बसेना असेही काही असते म्हणून....

एका माशांच्या प्रकारामध्ये हे मासे झुंडीने राहताना पाहिले. झुंड तरी किती मोठा...तर एक मोठी खोली भरून जाईल असा. एकदम आत छोटे मासे स्वतःला सुरक्षित ठेवतात, त्या बाहेरील थोडे मोठे मासे अन्न शोधतात आणि त्यापेक्षा मोठे मासे राज्यकर्ते असतात. समुद्रातील सगळा कारभार ते सांभाळतात. त्यांचे ते झुंड पाहून चंदेरी चादर समुद्रात लखलख  फिरताना भासते.

वालरूस  नावाचा एक समुद्र प्राणी म्हणजे हत्तीचा छोटा भाऊ वाटतो. मोठे दात आणि ढोलू  शरीर सांभाळत पाण्यात मस्त कसरती करत असतो.यथे एक इतका छोटा मासा होता कि त्याला भिंगातून पाहावे लागते आणि त्याचे शरीर म्हणजे नुसता एक लाल दिवा वाटत होता, बाकी काही जाणवत  नव्हते कि तो मासा असेल म्हणून.येथे समुद्रातील कोरल्स जशीच्या तशी आणून ठेवली आहेत. त्यांचे ते सुंदर रंग मन प्रफुल्लीत करून जातात.
येथून बाहेर पडल्यावर डॉल्फिन चा शो पाहायला जाता येते. येथील सील मासा एखाद्या उत्तम निष्णात डॉक्टर प्रमाणे पाण्यात बुडत असणाऱ्या  माणसाला बाहेर काढून, त्याच्या पोटातील पाणी काढून टाकून, त्याला तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन बरे करत होता. डॉल्फिन बद्दल तर आपल्याला माहीतच आहे कि ते माणसाची किती हुबेहूब नक्कल करू शकतात. ते चक्क माणसासारखे हसतात देखील.शिकण्याची इच्छा  आणि शिक्षक दोन्ही चांगले असेल तर काय धमाल करता येते ते अनुभवले.


पुढे फुरेई लगून ला गेलो कि त्या ठिकाणी आपल्याला पेंग्विन, डॉल्फिन यांच्या सोबत खेळता येते.फोटो काढता येतात, त्यांना जेवण भरवता येते. तेथे जाण्याआधी काळजी घेण्यासाठी माहिती सांगितली जाते:

1.सर्व प्रथम प्राण्यांना हात लावण्याआधी आणि नंतर हात साबणाने धुणे.
2.डॉल्फिन ला चेहऱ्याला हात लावणे, डोक्यावर थोपटणे, शेपटीला हात लावणे असे आवडत नाही. डॉल्फिन लगेच चावतो अथवा शेपटीने तडाखा देतो.
3.मासे पकडताना पायाची काळजी घ्या, एखादा मासा दगड समजून पाय ठेवाल आणि मासा पायाला चावेल इ. इ.
या डॉल्फिन सोबत खेळताना खूप मजा येते. त्यांना आधी १-२ मासे खायला घालायचे आणि मग त्यांच्या पाठीवर, पोटावर हात फिरवायचा. काही लोक तर त्यांच्या दातांना, जिभेला हात लावत होते. अर्थात हे सगळे निष्णात मार्गदर्शक सोबत  असताना करू शकत होतो. पांढरे डॉल्फिन तोंडात पाणी घेऊन ते आपल्या अंगावर उडवायचे आणि मग मोठ्याने हसायचे.


येथील अम्यूज़्मेंट पार्क मध्ये ब्लू फॉल म्हणून एक खेळ होता. १०४ मी उंच नेऊन तुम्हाला जोरात खाली सोडले जायचे आणि जमिनीच्या जवळ आल्यावर मधेच थांबवायचे. खूपच रोमहर्षक असा खेळ होता तो. दुसरीकडे पाण्यातून चालणारे रोलर कोस्टर, स्काय सायकलिंग, मेरी गो राउंड  वगैरे सारख्या गोष्टी होत्या.

समुद्रातील प्राण्यांचे असंख्य निरनिराळे खाद्य पदार्थ म्हणजे खवय्या लोकांसाठी पर्वणीच आहे.
बास आज एवढंच.


उद्या मी हाकोनेला जाणार आहे. तिकडचा जपान अनुभवून येते....आल्यावर भेटूच.....


........................................अस्मित (०३० नोव्हें. २०१२ जपान)

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२






तुझ्या सावलीने दिले मला शहाणपण
रखरखत्या उन्हाचे अनुभवी कोवळेपण
...........................अस्मित

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

फेसबुक / नवीन टेक्नॉलॉजी चा फायदा काय झाला,
प्रेम,शृंगार, विरहाच्या; कवितांचा पूर आला,
खोटे असतेच वागणे बरेचदा
पण खऱ्या भावनांचा शेवटी कचरा करून गेला
.....................अस्मित
 
 
 
 
 

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२



सुचत नाही आता शब्दांचे बहाणे
रोज उष्टावत जातो आकड्यांचे रकाने.


आवाज पैशाचा केवढा चपळ
सुगंधित होते त्यांचे कलेवर

फुलांनाही यांच्या उधार देखलेपण.

बाजार मांडतो प्रत्येक देवाचा
सांगा कधी साधला होता संवाद आत्म्याचा .....?
............................अस्मित

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१२

माझी जपान सफर - १०


आधी एकदा जाऊन पाहिलं असले तरी या शनिवारी मैत्रिणी साठी परत टोकियोला जाणे झाले.या वेळेस जाताना आम्हाला मस्त चित्रांनी सजवलेल्या रेल्वेने जाता आले.टिव्हीवर भेटणारे सगळे कार्टून मित्र या रेल्वेच्या भिंतीवर रंगविण्यात आले होते.खरे म्हणजे ती रेल्वे "तोत्तोचान"ची रेल्वे वाटत होती अगदी... :)
टोकियोला गेल्यावर आम्ही पायी न फिरता टोकियो दर्शन च्या बसने जायचे निश्चित केले.स्काय बस कंपनीच्या ओपन बस मधून फिरताना एकदम यश राज टाईप सिनेमामध्ये असल्यासारखे वाटत  होते. :)
त्या बस ला १८०० येन भाडे होते आणि कुठेही उतरा आणि चढा असा १ दिवसाचा तो पास होता.बस मधून हिंडताना मस्त टोकियो शहर आणि त्याच्या  इतिहासाचे, दर्शन आणि ज्ञान मिळाले.
टोकियो रेल्वे स्थानकाबाहेरच एक मजेशीर टॅक्सी दिसली.तिला पाहून आपल्याकडील २ बिघा जमीन आठवला. पण हि टॅक्सी त्याची सुधारित आवृत्ती होती.या ओपेन टॅक्सीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला थंडी वाजू नये म्हणून
ब्लॅंकेटची व्यवस्था करण्यात आली होती (आता एवढे करण्यापेक्षा आधी "बंद टॅक्सी" का वापरली नाही असला फालतू प्रश्न विचारू नका मला...कारण टॅक्सी आणि टॅक्सी ड्राइवर या दोघांशी मला काही घेणदेण  नाही).
बागा, शॉपिंग मॉल,५ तारांकित हॉटेल,रस्त्यातून जाणारे मोर्चे असे विविध गोष्टींचे दर्शन घेत आणि त्याबद्दलची सगळी माहिती ऐकत आम्ही एकदाचे टोकियो टॉवरला पोहचलो.भूकंप प्रणव देशतील या उंच उंच इमारती ते सुद्धा कॉंक्रीटचा कमीतकमी वापर करून बांधलेल्या, हे सर्व पाहून त्यांच्या ज्ञानाचे कौतुक वाटते.
टोकियो टॉवर बद्दल आधीच्या लेखात (माझी जपान सफर - ५) माहिती दिलेली असल्यामुळे इथे परत काही लिहित नाही. या वेळेस काही नवीन गोष्टी नजरेस  पडल्या त्या म्हणजे टोकियो टॉवर बांधतानाचे अगदी  जागा निवडणे, ड्रॉईंग-प्लॅन तयार करणे, त्या काळातील वाहतूक व्यवस्था इ.इ. सगळ्या गोष्टींचे माहितीसहित फोटो, जगातील सर्वात मोठ्या "स्काय ट्री" चे टोकियो टॉवरवरून दर्शन आणि टोकियो टॉवर रात्री पाहण्याचे सुख.काय अवर्णनीय अनुभव.....अहाहा...!(तोंडातून हा शब्द बाहेर पडलाच पाहिजे.....)

येथे काचेचे एक मोठे हृदय (वॉर्म हार्ट) ठेवण्यात आले होते आणि त्या हृदयाच्या आत टोकियो टॉवरची लहान प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती.हे हृदय १९५८ पासून वापरात आहे.जपान मध्ये आता पासूनच ख्रिसमसची तयारी चालू आहे. त्यासाठी सगळीकडे विविध प्रकारे सजविण्यात  आलेले आहे.टॉवरच्या आवारात मस्त ख्रिसमसचे झाड, खोट्या बर्फाचा पाऊस, नाच-गाणे, चालू होते.टॉवर वरून शरदऋतूतील झाडाच्या रंगबदलाचे मोठे सुंदर दृश्य दिसत होते.
टॉवर आधीच पाहिलेला असल्याने माझे लक्ष जपानी लोकांचे निरीक्षण करण्याकडे होते. टॉवर मध्ये जेवण करत असताना आमच्या शेजारील टेबलवर एक विचित्र केशकर्तन आणि रंग मारलेला एक मुलगा आला आणि त्याच्या त्या अवतारामुळे मला आणि माझ्या मैत्रिणीला अक्षरश: उलटी होईल असे वाटत होते. इतके घाण हिरवे लाल रंग आणि सरड्या सारखी केसरचना पाहून डायनासोरच्या युगातील एक प्राणी चुकून येथेच राहिला असे वाटू लागले.दुसऱ्या  एका टेबलवर २ मुली नुसतीच जागा अडवून मोबाईलवर गेम खेळत बसल्या होत्या.एक जण जेवण करून वामकुक्षी घेत होता.तिथे फिरत असताना चेन्नईचा एक घोळका आमच्या समोर आला आणि जपान मध्ये भारतीय भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला. मी मनात म्हणाले आमच्या कंपनीत या सगळी तमिळ भावंडे भेटतील.अगदी कडकडून भेटा...त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी आम्हा दोघींना एक-एक बिस्किट्स चा पुडा दिला (तो बिस्किट्सचा पुडा टॉवर मध्ये  ख्रिसमस आणि जाहिरात व्हावी म्हणून फुकट देत होते...तरी देखील त्यांचा उदार मन मला भावले.कारण काही लोक ते पण देणार नाहीत दुसर्यांना...असो)

टॉवर मध्ये खरेदी करून झाल्यावर बाहेर आलो तर संध्याकाळचे ५ वाजले होते आणि अंधार पडून थंडी वाढली होती.बस साठी वाट  असताना मागे वळून टॉवर कडे पहिले आणि डोळेच दिपले...पहिल्यांदा पाहिलेला टॉवर हाच का असा प्रश्न पडला...कारण आधी पाहिलेला टॉवर दिवसा उजेडी होता आणि आत्ता काळ्या आकाशाच्या कॅनव्हास पेपरवर दिसणारा प्रकाशमय टॉवर-एकदम हंड्सम....स्वतःची ओळख दाखवून देणारा...टॉवचे फोटो घेत असताना मधेच सगळ्या लाईटस पूर्ण घालवल्या आणि हळूहळू एक-एक करत टॉवर वरचे मंद आणि वेगवेगळ्या रंगांचे दिवे प्रज्वलित करण्यात आले.काय अनुभव होता तो....आपल्याकडे दिवाळी पहाट ला सकाळी धुक्यात आणि मस्त गारठ्यात जश्या पणत्या लावून तळ्यातील गणपती सजवलेला असतो अगदी तसाच अनुभव.माझी दिवाळी तर इथेच सुरु झाली.आणि माझ्याहि नकळत मी टॉवरलाच "आय लव यू " म्हणाले (कोण म्हणाले रे "आरेरे...दुर्दैव आमचे...!!!)
परत जाताना जायंट व्हील, आसाही वर्तमानपत्र व शिंनीतेत्सू कंपनीच्या  इमारती (या शिंनीतेत्सू कंपनीने आम्हाला Oracle  मध्ये असताना सारखे काम पाठवून खूप छळले होते  ) पाहिल्या आणि टॉवरप्रेम मनात ठेऊन घरी परतलो...
........................................अस्मित (०९ नोव्हें. २०१२ जपान)

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

विटाळलेला देह माझा
विकृतीच्या श्वासांनी,
सांधून दे मन माझे
तुझ्याच देव हातांनी
.....................................अस्मित (०८ नोव्हें.२०१२)








माणसाने किती चांगल असावं...
चूकनार्यादेखील त्याच्या नकळत पदरात घ्यावं.
घडी घडी दुसर्याला सावरताना,
स्वतः मात्र निर्मळ राहावं.
..............................................अस्मित (७ नोव्हें.२०१२)

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२



मला निवडुंग खूप भावतो
आमच्या नात्यात तो गुलमोहोर फुलवतो,
काटे असतातच नेहमीचे सोबत
माझे मन मात्र फक्त तोच सांभाळतो.
.......................अस्मित(७ नोव्हें.)

(आमच्या नात्यात = निवडुंग आणि मी)


रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२









माझी जपान सफर - ९




माझी मैत्रीण सन २००० पासून माता निर्मला देवी यांच्या सहजयोगाची ध्यानधारणा करते.जगभर यांचे सहजयोगी विखुरलेले आहेत. जपान मध्ये पण काही सहजयोगी आहेत. माझ्या मैत्रिणीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि गेल्या २८ ला आम्ही त्यांच्या ध्यानधारणेच्या कार्यक्रमाला जाऊन आलो.मला स्वतःला असे स्वामी,माता असले प्रकार फार काही रुचत नाहीत, त्यामुळे मी फार तठस्थ होते याबाबतीत.
तेथे जाण्यापूर्वी माझ्या मैत्रिणीने मला बरेच काही सांगितले या सहजयोग बद्दल.७ चक्रांचे शुद्धीकरण, ध्यान करणे इ.इ. तिच्या सांगण्यानुसार या ठिकाणी खूप लोक भारतीय पोशाखात आणि कुंकू वगैरे लाऊन आलेले असतील.वास्तविक तेथे आम्ही धरून मोजून १२ लोक होतो. त्यात मी सोडले तर कोणीही कुंकू लावून नव्हते. अगदी माझी मैत्रीण पण, का तर तिला कुंकवाची allergy  आहे.असो....
कार्यक्रम सुरु करताना एका जपानी मानसिक रोग तज्ञाने (त्यांचे नाव हितोशी असे होते) या योगाची आणि माता निर्मलादेवी बद्दल थोडी माहिती दिली.त्यांनी भारतात येऊन हा योग शिकून मग जपान मध्ये त्याचे प्रोग्राम सुरु केले (त्यांनी एका भारतीय स्त्रीशी लग्न केले आहे.) त्यांच्या सांगण्यानुसार जपानमध्ये दरवर्षी सरासरी ३०,००० लोक आत्महत्या करतात.जपानी लोकांची मुलांना वाढवण्याची पद्धत आणि त्यांचे आयुष्य याला कारणीभूत आहे.जपानी माणूस चांगले जीवन जगण्यात कुठेतरी कमी पडतो.काही वर्षांनी त्यांना एकटेपण, नैराश्य यांनी ग्रासल्यामुळे लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात असे त्यांचे म्हणणे. भारतासारख्या अध्यात्मिक क्षेत्रात प्रगत देशामुळे हे प्रमाण कमी होईल अशी त्यांना आशा आहे.
(थोड विषयांतर) मी स्वतः जपानची "रेकी हिलिंग" मास्तर प्रोग्राम पूर्ण शिकले आहे. हि पद्धती जपानची असली तरी ती गौतम बुद्धाच्या "लोटस सूत्र" यावर आधारलेली आहे (बुद्ध आपला कि त्यांचा हा वाद गौण आहे.)
यामध्ये निसर्गातील अलौकिक शक्ति वापरून आपली ७ चक्रे, आपल्या सभोवतालची प्रभावळ यांना शुध्द करून त्यांची शक्ती जागृत केली जाते. हि शक्ती वापरून आपण स्वतः ला आणि दुसर्यांना उत्तम आरोग्य देऊ शकतो आणि त्यांची दुखणी बरी करू शकतो (मला खूप चांगला अनुभव आहे याचा.)  मी हे सगळे जाणून असल्यामुळे मला या सहजयोगातील काही गोष्टी पटल्या नाहीत किंवा काही चुकीच्या वाटल्या.
तेथे ध्यानाला बसताना लोक खुर्चीत बसले होते.पाय जमिनीला खाली टेकवलेले आणि पायात चप्पल,बूट तसेच. ध्यान करताना शरीरातील ७ चक्रांवर हात ठेवून काही आज्ञा देत होते. जसे कि "हे माता, माझा आत्मा शुध्द कर", " लोकांना आणि मला माफ कर" इ.....सहजयोग मला थोडा स्व:केंद्रित वाटला. याच्याउलट रेकीमध्ये स्वतः सोबतच दुसर्यांना सुद्धा त्याचा उपयोग करून देता येतो.
त्यांच्या चक्रावर हात ठेवण्याच्या पद्धती थोड्या क्लिष्ट वाटल्या. ते करत असताना मला पाठीत असह्य कळा येऊ लागल्या आणि मी ध्यान सोडून माझी रेकी पद्धत वापरून पाठीचे दुखणे थांबविले.
१५मि.ध्यान धारणा करून झाल्यावर लोक खाऊ खात गप्पामारत बसलेले पाहून मला प्रश्न पडला, कि गेल्या १५मि. मध्ये काय ध्यान केले ????? सगळे वातावरण फिरायला आल्यासारखे वाटत होते.
एकंदर मला जपानमधील "आपल्याकडचा" ध्यानधारणा प्रकार फार काही रुचला नाही.
........................................अस्मित (०५ नोव्हें. २०१२ जपान)