मंगळवार, १३ जुलै, २०१०

होते तुझेच सर्व,
माझे नव्हते काही..
होतो "राजा" तरीही,
"दरबार" मात्र नाही..
होते मनावर "राज्य"
उरात भलते धैर्य,
सोडून वास्तवाला
गाईले तुझेच काव्य...
अर्ध्या घडीची ही कहाणी
दोन घडीचा डाव,
कोणता राजा? कसला दरबार?
सारा स्वप्नांचाच गाव...

-अस्मित

गुरुवार, १३ मे, २०१०

हा भास तुझा होताना..
विसरतो सारे पाश,
असे वाटते रोज नव्याने,
आला स्वप्नांचा मधुमास..
पुरे झाले चंद्र-तारे,
पुरे आता हे स्वप्न-मनोरे,
ये लवकरी, प्राण आले वरी
येते, फक्त, तुझेच नाव अधरी...
सत्य होवो हा भास...
येवो स्वप्नांचा मधुमास,
विसरें सारे पाश...
मिठीत, तुझा होताना...

-अस्मित

रविवार, २ मे, २०१०

इतके सुंदर गीत मी कसे लिहून गेलो,
पायास माती माझ्या, हे विसरून गेलो...
आज सावरू नका माझ्या मनाला...
धुंदीत "मारवा" मी, माझाच आळवुन गेलो...
प्रत्येक तान माझी, आळवीत मी राहिलो...
प्रत्येक शब्दांमधे मी श्वास भरून राहिलो...
तल्लीनता या मनाची काय सांगू तुला?
प्रत्येक स्वरासोबत मी तुझा होत गेलो...
एक-एक सरगम माझी, मी गीत तुझे झालो...
एक-एक ओळ माझी, मी गझल तुझी झालो...
तू माझी पूर्णता, तूच माझी रिक्तता,
कोणास सांगू कसे, मी पुन्हा जन्माया लागलो
-अस्मित

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

साथ आपली साता जन्माची...
प्रत्येक जन्मी भेटतोस, पण मिलन कधीच झाले नाही...
प्रत्येक जन्मी येतोस, पण माझं कधीच ऐकत नाही...
असा कसा रे तू? इतका निष्ठूर?

जिथे जातो तिथे सर्व होते भेसूर..
एकदा तरी भेटत जा...
तुझी माझी दृष्टी-भेट होताच मी तुझा होऊन जातो..
पण जगाला कळतच नाही की तू कसा आहेस..!!!

तुझ्या माझ्या मिलनाची कथा
मला या जगाला सांगायची आहे ...
म्हणूनच सांगतो मृत्यू...
साथ आपली साता जन्माची...
अरे, एकदा तरी भेट....

-अस्मित
आलास का नेहमी प्रमाणे;
जरा धीर नाही तुला...
कितीही नको म्हणालो तरी
छळत रहा पुन्हा पुन्हा.....
आलाचेस तर ये आत, हो जरा शांत
तूच तर सुरूवात आणि तूच आमचा अंत
दरवर्षी तू येणार सोबत तिलाही आणणार...
माझा कॉफी चा कप, मग अजुनच एकटा होणार...
तुझहि खरय म्हणा ;
तिच्या शिवाय तुझी सोबत, कल्पनाच करवत नाही..
कितीही भिजल तरी हृदया पर्यंत पोहचत नाही.
आत झिरपत राहतो स्वत:चाच असा एक पाउस..
उधळत राहतो असंख्य वादळे शरीराच्या अंधारात..
आणि मी मात्र रुतत जातो स्वत:च्या चिखलात.
जाता-जाता मित्रा एक काम करशील का?
तिच्या डोळ्यातील थोडा पाउस,
पुढील वर्षी, माझ्या दारी सान्डशील का?
आज माझ्या शब्दांनी पावसाशी भांडण केले,
म्हणाले, या वर्षी आम्ही नाही लिहणार तुझ्यावर कविता....
दरवर्षी असाच न कळवता येतोस आणि तुझ्या स्वागताच्या तयारीवर पाणी फिरवून ठेवतोस...
या वेळेला मात्र एकदम कट्टी,
लोकांनाही कळू दे, शब्दांच्या सजावटी शिवाय पाउस किती पोरका असतो ते.....

पाउस यावर हसून म्हणाला,
मी कधीही येऊन कोसळलो,
तरी मला चिंब भिजवणारे तुम्हीच माझे सोबती...
तुमच्या शिवाय मी पोरका,
म्हणून दरवर्षी असा अचानक येऊन प्रत्येकाच्या मनात तुमचा अंकुर रुजवून जातो
आणि भिजत राहतो अखंड......तुमच्याच रूजव्यात..!!!
: -अस्मित

शनिवार, १० एप्रिल, २०१०

अर्धा श्वास तुझा, त्यात अर्धा माझा होता...
रात्र होती अर्धी-अर्धी, सोबतीला चंद्र अर्धा होता...

अर्धी उमललेली रात-राणी, अर्धी फुललेली गात्रं..
स्वप्न चंदेरी घेऊन आली, चमचमती तारकांची रात्र..

अर्धा वेडेपणा तुझा, त्यात अर्धा माझा होता..
अर्ध्या अर्ध्या कवितेचा इथेच अर्धा अंत होता..

-अस्मित

गुरुवार, ८ एप्रिल, २०१०

दिवसामागून दिवस जात होते,
आणि तुला विसरनं कठीण होत होतं
तू सोडून गेलीस याची खंत नव्हती,
आता पुढे काय याचाच विचार होता...

हॅमलेट नाटकात शेक्स्पीयर नि लिहिलेलं वाक्य नेहमी आठवायचं
"जगावं की मराव , हाच एक प्रश्न आहे..."
To Be Or Not To Be That is the question.....
पण मग स्वत:ला समजावलं
आणि जगायचा निर्धार केला...

आणि आता जगतोय तुझ्या वीणा...
असं म्हणतात की "काळ सगळ्यावर औषध आहे"
पण हे औषध वर्तमान काळात लागू होत नाही
वर्तमान जेंव्हा भूतकाळात बदलतो तेंव्हाच याचा उपयोग...

होय ना?

त्यावेळेला "दिवसामागून दिवस जात होते"
आणि....
आज..???


-अस्मित

बुधवार, २४ मार्च, २०१०

मन उदास माझे,
तुझी वाट पहात आहे..
का रे दुरावा असा?
की ही प्रेमाची परीक्षा आहे?

अशी एकांती असता,
तुझ्या विचारांचेच काहूर उठते..
त्या लाटांवरती मग.
मी एकटीच दिशाहीन तरंगते..

तुझीच रे, तुझीच मी...
दुसरे मनी न ये काही..
तुझ्यावीणा सखया,
मी माझी न राही...

ये लवकरी,
भेटीसाठी ही काया आतुरली..
रोम-रोमातूनी आता,
रात-राणी बहरली.....

गुरुवार, ११ मार्च, २०१०

पाण्यातील एक नाव, शोधीत किनारा एक गाव,
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...

गवसावा किनारा, कुणीतरी माझा,
एक नाविक अन् पसारा समुद्राचा
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...1

तो चंद्र ही आज फितूर जाहला, लपवुनी चांदणे गावी निजला
वार्‍याचे ते चरण स्पर्शुनि घेत असे ती धाव
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...2

ऋतू चक्राचे आवर्तन संपले, शोध घेऊनी श्‍वासही मिटले
काळोखाच्या डोहाने या नवा मांडला डाव
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...3

पाण्यातील या तप्तपदिला नावही मग सरासवून गेली
उधळून टाकिले सर्वस्व तिने झेलीत चांदण घाव
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...4
:- aASmit
चिंब - चिंब भिजल्यावर,
आठवण तुझी येते...
सुकलेली ती जखम मग
पुन्हा पुन्हा ओलावते...
ही खरंच आठवण तुझी
की मनाचे खेळ सारे?
" विसरलो-विसरलो " म्हणता- म्हणता
कधीच विसरता न येणारे...
भळभळणारी जखम मनाची,
विचारते पुन्हा पुन्हा...
प्रेम केले, प्रेम करूनी,
असा मी काय गुन्हा केला...
-अस्मित

रविवार, ७ मार्च, २०१०

अनंताच्या प्रवासासाठी काळ जरा थांबला...
विसाव्याचे दोन क्षण मिळाले नाहीत त्याला..!!
आठवणींची राख डोळ्यात जाउ नये म्हणून घेतले डोळे मिटून
तरी पण एक उष्ण कढ उतरला गळ्यातून....
आयुष्याला लागलेली किड जन्मभर जोपासली
तरी देखील कळेना ही जगण्याची उर्मि कोठली.....???
चुकले नव्हते तुझे काही, माझेही नव्हते
नियतीने टाकलेले ते दान उलटले होते.
बकुळाचा सुगंध हवेत केव्हांच विरून गेला
कोपर्‍यातील निवडुंग मात्र नेहमी फुलत राहिला...
नाटक, संगीतात मन आता रमत नाही
भासाशिवाय माझ्यात कोणीच वसत नाही
मनाने लादलेले वैधव्य मी कायमच जोपासले
शरीर मात्र शृंगाराचे घाव सोसत राहीले....
चाललेली सप्तपदि सारखी सोबत होती
पडलेली पावले मात्र उलटी उमटत होती........

शनिवार, ६ मार्च, २०१०

आला चंद्र प्रकाश घेऊन अंगणी
तुझ्या आठवाने अश्रू आले नयनी

आठवती ते क्षण सारे पुन्हा पुन्हा फिरुनी
काजळ काळी रात्र आली
चंद्र प्रकाशी न्हाउन गेली
तुझा हळूवार स्पर्श आठविता
पापण्यांची कड ओलवली
आला चंद्र प्रकाश घेऊन अंगणी......

होवो अंत या विरहाचा
विसावा मिळो तुझ्या बाहुंचा
तुझ्या मिठीत विसावण्या,ही काया आतूरली.
चंद्र उगवला पुनवेचा
सवे मेळा चांदण्यांचा ..
हात तुझा हाती माझ्या
सोबतीला बहार निशिगंधाचा..
तुझ्या माझ्या भेटीची ही रात्र नवी नवी
विरहाचे दु:ख सारून आली उत्साह लेऊनि..
मिलनाची ही रात्र सखे तुझ्या माझ्या संगमाची
एक एक क्षण हा आजचा पुन्हा नव्याने जगण्याची.
पुन्हा तुझ्या भेटीने मन माझे आसुसले
दाटून आले हृदय अन् डोळे पाणावले.....
सरला विरह आता घटीका मीलनाची आली
मनातली सारी इच्छा आज पूर्ण झाली.........
अशीच रहा सोबतीला माझ्या तू प्रिये
आयुष्यात कितीही आल्या लाटा आणि वादळे........

अबोल ओठ तुझे
बोलून खूप गेले
शब्द पडले कमी
पण नजरेने काम केले

होते मनी खुप काही
पण ओठांवर ना आले
मनातले गुज तुझे ते
नजरेने प्रकट केले

आज कळली मजला
प्रीती तुझी ही प्रिये
होते मला जे सांगायचे
ते तुच व्यक्त केले

शनिवार, ९ जानेवारी, २०१०

शृंगार

शृंगार
नजरेला नजर भिडू दे, श्‍वास श्‍वासात मिसळू दे,
अंतरातील काही ओठांना कळू दे....
उमजले तुला जे काही,
ते माझ्यात उतरू दे
फुललेल्या या देहातुनी रातराणी दरवळु दे....
तोडून हे पाश सारे, जे दुरावा आणती,
भावनांच्या जलतरंगाने
आज आकाश घुसमटू दे.....
-अस्मित