रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

"कल्हईवाला"

आमच्या घरातील पितळीची भांडी पाहिली कि मला हमखास एका व्यक्तीची आठवण येते.
माझ्या लहानपणी (तसे माझे वय फार नाहीये, तरीपण सुरुवात काय करावी हे न समजल्याने आणि खरंच हि गोष्ट लहानपणीची असल्याने पर्याय नव्हता... असो.)
तर, लहानपणी आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तेथे एक "कल्हईवाला"यायचा.बुटका, थुलथुलीत शरीरयष्टी, मोठा उभट गोल चेहरा, गरगरीत डोळे आणि जगातील तमाम रंगाच्या कंपन्या झक मारतील अशी रंगाची ग्यारंटी असणारा असा वल्ली.याच्या नावाचा अथवा गावाचा कोणाला काही पत्ता नव्हता.तो कुठे राहतो, काय जेवतो, घरी कोण अशी कोणतीही माहिती कोणाला अवगत नव्हती. सगळ्यांसाठी तो फक्त एक "कल्हईवाला" होता.

दुपारच्या वेळेला "कल्हई....!" अशी जोरात आरोळी देत आमच्या गल्लीत याचा प्रवेश व्हायचा.पांढरा घोळदार लेंगा, फिकट अष्टगंधी रंगाचा कुडता असा त्याचा नेहमीचा वेश असायचा. या माणसाने कधी वेगळ्या रंगाचे कपडे घातल्याचे अजूनही स्मरत नाही.

एकदा का गल्लीत प्रवेश झाला कि भांड्यांना कल्हई करून घेण्यापासून ते लहान मुलांना भीती दाखविण्यासाठी याचा उपयोग करून घेण्यात येत असे. त्याचे एकंदर रूप आणि आवाज ऐकता मुलं घाबरून घरात लपून न बसतील तर नवलच.
हा आला कि आयांना कोण जाणे काय आनंद व्हायचा. "ओ कल्हईवाले आमच्या कार्ट्याला ओरडा जरा... जेवत नाहीये, नखे खातोय इ." असंख्य तक्रारी त्याच्या खाती जमा करून आपण मात्र मोकळ्या व्हायच्या.याने आपले लाल डोळे वटारताच मुले रडगाणी सुरु करणारच याची खात्री.या मानसला कधीही दारू पिलेला पहिला नाही परंतु,याचे डोळे नेहमी लाल असायचे.

गल्लीच्या सुरुवातीलाच एक पानाची टपरी होती(ती टपरी आणि पानवाला अजूनही आहे फक्त टपरीचे रूप कालपरत्वे ५ स्टार झालेय), त्या टपरी शेजारी याचे कल्हईचे दुकान मांडले जायचे. दुकान म्हणजे तरी काय..., जमिनीत खड्डा खणून त्यात लावलेली छोटी भट्टी, शेजारी पसरलेली भांडी,कल्हई झाल्यावर भांडे थंड करण्यासाठी पाणी इ.इ. भांड्यांना कल्हई करताना याच्या हाताला कसे भाजत नाही याचे उत्तर मला कधीही मिळाले नाही आणि त्याला विचारण्याची हिम्मत पण कधी झाली नाही.(कारण मी लहान होते न..मग मी पण घाबरायचेच कि त्याला...). कल्हई करताना येणारा पांढऱ्या धुराचा वास मला छान वाटायचा(बहुदा तो वास नवसागरचा असावा.).पितळी भांड्यांना कल्हई करून सोन्यासारखे चमकवण्याचे काम तो उत्तमरित्या पार पाडायचा.

पुढे काही वर्षांनी, गल्लीतील रस्ता नवीन झाला तेव्हां त्याचे पानाच्या टपरी शेजारील दुकान उचलून पुस्तके बाईंड करण्याच्या दुकानाजवळ हलविण्यात आले.त्यानंतर मात्र त्याचे क्वचितच येणे-जाणे असायचे.

कालपरत्वे पितळी भांडी गायब झाली,
आणि कल्हईवाला त्याच्या आरोळी सोबत.......

खरेतर मला घरची पितळी भांडी दिसली कि हा माणूस आठवतच नाही. कारण आम्ही कधी त्याच्याकडून कल्हई करून घेतल्याचे माझ्या स्मरणात नाही. हि वल्ली आठवण्याचे कारण म्हणजे माझ्या ऑफिस मधील एका व्यक्तीचे नाव याच्या नावाशी मिळतेजुळते आहे.....

........................अस्मित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: