रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

पहिला कॅलिडोस्कोप "आठवणींचा"

पहिला कॅलिडोस्कोप "आठवणींचा"

चेन्नईला येउन दीड वर्ष उलटले.एका नोकरीमध्ये स्थिर होईपर्यंत दुसरी नोकरी शोधली.
नवीन ठिकाणी जाताच तिथून पुढे गावाला जाण्याची मिळालेली संधी (गावाला म्हणजे जपानला ) आणि गेल्या महिन्या पर्यंत असलेला कामाचा ताण.
या सगळ्यामध्ये वाचन, लिखाण करायला पुरेसा वेळ देत न आल्याची खंत लागली होती. आणि खंत म्हणजे तरी किती…तर लिहायला काही सुचत नव्हते म्हणून अगदी
अस्वस्थ वाटू लागले.त्या अस्वस्थतेत घराबाहेर पडले, खूप दूरवर चालत गेले. नशिबाने बाहेर हलका पाऊस आणि मस्त थंड वातावरण होते.

अचानक एक कल्पना सुचली. चालता चालता शब्दांची जुळवाजुळव सुरु झाली.लेखणीला शब्दांचे श्वास मिळाले आणि अस्वस्थता मागे पडली.

झरझर आठवणी रिंगण धरू लागल्या.................थेट बालपणापासूनच्या.

लहानपणी(म्हणजे शाळेत जायच्या वयात) उन्हाळ्याची सुट्टी लागली कि माझे वडील त्यांच्या शाळेच्या वाचनालयातून पुस्तके आणायचे.(माझे वडील ज्या शाळेत शिक्षक होते
तेथील प्रयोगशाळा, पोहण्याचा तलाव आणि वाचनालय यावर आमचा पूर्ण हक्क आहे असेच वाटायचे मला).पुस्तके म्हणजे २-३ नव्हे तर साधारण एक पिशवीभर तरी
वेगवेगळ्या विषयांची, वजनांची, रंगांची शिदोरी असायची.हातात येईल ते पुस्तक शक्य तेवढ्या लवकर वाचून काढायचे आणि परत दुसऱ्या पुस्तकांची मागणी करून ठेवायची हे
आम्हा भावंडांचे ठरलेले उद्योग होते.
लहानपणी फार काही कळत नसले तरी मोठे झाल्यावर या लागलेल्या (किंवा लावलेल्या) चांगल्या सवयीचा फायदा समजून आला आणि त्यासाठी मी माझ्या आई-वडिलांची नेहमीच ऋणी राहीन.

वाचन हे फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीपुरतेच मर्यादित होते असे नाही. तर बालवाडी पासून ते महाविद्यालाच्या अभ्यासक्रमातील मराठी भाषेची सगळी पुस्तके मिळतील तेव्हां वाचायची.
पूर्वी वाणसामान आणले आणि ते डब्यांमधून भरून झाले कि त्या सोबत आलेले वर्तमानपत्राचे तुकडे, नवरात्रीमध्ये वाटलेल्या महालक्ष्मिच्या व्रताची पुस्तके, बाहेरील देशांची अनुवादित पुस्तके सगळे काही वाचून काढायचे.
चौघीजणी, ययाती, महानायक, माईन काम्फ इ. इ. बरीच पुस्तके वाचण्याच्या आनंदापेक्षा वाचून संपल्याचे दु:ख जास्त व्हायचे.म्हणून मग परत परत तीच पुस्तके वाचून काढायचे.आवडलेले परिच्छेद डायरीत उतरवून घ्यायचे. अजूनही ती डायरी सांभाळून ठेवली आहे मी. कधीतरी सामान आवरताना नजरेस पडली कि वाचते.आमच्या घराजवळ मॅजेस्टिक प्रकाशनची इमारत आहे. त्यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुस्तक प्रदर्शन असायचे. दिवसभर तेथे बसून हवी ती पुस्तके वाचण्याचे समाधान काही औरच असायचे.

पुस्तकांवर पेनने खाणाखुणा करून, त्यावर वरण-भात, भाजीचे, तेलाचे असे कोणत्याही प्रकारचे डाग पाडून अथवा खूण म्हणून पानाचे कोपरे दुमडून पुस्तकांना विद्रूप करणारे करंटे पाहिले कि माझे डोके आऊट झालेच म्हणून समजा. एक तर हे महाभाग पुस्तके कधी स्वतः विकत घेणार नाहीत आणि दुसऱ्यांची पुस्तके घाण करून निर्लज्ज मनाने परत करतील.९ वीत असताना जंगम आडनावाची माझी एक मैत्रीण होती. एकदा तिने संस्कृतच्या तासाला माझ्या पुस्तकावर पेनने एका ओळीखाली रेघ मारली. माझा पारा जो चढला, कि त्या रागाच्या भरात खोडरबरने ती पेनची रेघ खोडत असताना पुस्तकावरची अक्षरे पण खोडली जाऊ लागली याकडे माझे लक्षच गेले नाही.त्या दिवसानंतर माझ्या मैत्रिणीने माझ्या पुस्तकावर पेनच काय पण साधे डोळे लावण्याचेही कष्ट घेतले नसावेत बहुदा.

पुस्तकांच्या बाबतीत मी खूपच स्वार्थी आहे. म्हणजे असे कि, घरात आणलेले कोणतेही पुस्तक आधी मला मिळाले पाहिजे असा माझा हट्ट असायचा. आणि माझे वाचून संपले कि ते वाचनालयातून लगेच बदलून आणायचे, मग घरातील इतर व्यक्तींना अजून ते वाचायचे आहे याचा विचार देखील माझ्या मनात येत नसायचा.त्यामुळे माझी आई आणि बहिण बरेचदा माझ्यावर रागवायच्या.

कोणतेही पुस्तक वाचताना त्या त्या पुस्तकांचे नायकनायिका मनावर राज्य करून असायचे. उदा. शिवाजी महाराज, पेशवे, कर्ण, चौघीजणी मधल्या चारही बहिणी सगळे काही आपणच आहोत असे वाटत राहायचे. बर्मुडा ट्राइॅंगल आणि एक चुंबकीय प्रयोग करून लोक गायब करण्या विषयीचे एक पुस्तक वाचले(नाव लक्षात नाही आता) तेव्हां मी आणि माझा भाऊ मनातून खूप घाबरलेले होतो.मनात यायचे कि आपणही असेच गायब झालो तर....असो.

अशाच आणखी खूप आठवणी आहेत पुस्तकांच्या. सगळ्याच लिहायला लागले तर कॅलिडोस्कोप चा दुसरा रंग आणि आकार पाहता येणार नाही.म्हणून हा भाग इथेच थांबवू.

: अस्मित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: