शनिवार, २६ एप्रिल, २०१४

Athvan


कॅलीडोस्कोप : १० - Breathing LIFE...................




कॅलीडोस्कोप : १०

Breathing LIFE...................

सुरुवातीला काहीसा नकोस वाटणारा हा अनुभव आता माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेलाय.
असा काय आहे या "आर्ट ऑफ लिव्हिंग" मध्ये; नुसताच श्वासांचा खेळ आहे? कि इतरांप्रमाणे थोतांड आहे?"
हे जाणून घेण्यासाठी आधी तुम्ही स्वतः या गोष्टी शिका.लोक काय बोलतात या पेक्षा स्वानुभव घ्या.

माझ्यासाठी म्हणाल तर हि कृष्णाची बासरी आहे. जेवढी ऐकाल तेवढी ओढ वाढत जाते.आणखीन जास्त खोलात जाऊन याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा लागून राहते.
आपल्या भारतात एवढे साधू-संत आहेत आणि त्यामधील काही लोक एवढ्या खालच्या पातळीला गेलेले आहेत कि आपल्याला या सगळ्यांबद्दल शंका येणे साहजिक आहे. (मी बंगलोर मध्ये असताना कुंडलिनी शक्ती जागृतीच्या एका बाबांच्या शिबीराला जाऊन आले होते. एका मातेची एक दिवसाची कार्यशाळा जाऊन पाहिली होती. दोन्ही अनुभव खूप वाईट होते) पण इथे येउन माझे मन नक्कीच संशय मुक्त झाले, कारण इथे स्वतःचे आयुष्य चांगले करून चांगला समाज निर्माण करण्यावर भर दिलेला आहे.

खरतर या लेख मालिकेत प्रत्येक दिवसाची इत्यंभूत माहिती देऊन मी माझी लेख संख्या वाढवू शकत होते. पण प्रत्येकाला येणारे अनुभव आणि त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान या सर्वस्वी व्यक्ती सापेक्ष गोष्टी असल्याने तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पहा.येथे येउन आपण इतर कोणावर नाही तर स्वतःवरच उपकार करत आहोत.

बाकी तुम्ही ठरवा तुमचे स्वतःवर प्रेम आहे कि..........

"आर्ट ऑफ लिव्हिंग"शी निगडीत सर्व लेख हे माझे अनुभव आहेत आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे.
तुम्हाला जर काही वेगळे अनुभव असतील तर ते जरूर सांगा. उगाच मोर्चा / दगड-शाई-चप्पल फेक असले प्रकार करू नये.

.....................................(समाप्त)

..................................................................अस्मित (२० मार्च २०१४)

कॅलीडोस्कोप : ९ - Breathing LIFE...................




कॅलीडोस्कोप : ९

Breathing LIFE...................

८ फेब्रु चा दिवस थोडा वाईट सुरु झाला होता. मी स्वतः ४ वाजता उठून योगा आणि सुदर्शन क्रिया करून वेळेत तयार असताना फक्त इतरांच्या आळशी पणामुळे बरोबर एक तास उशिरा कार्यशाळेत सहभागी झालो होतो.
आधीच माझ डोक तापलेलं असताना वर आणखीन इतरांच्या नजरा आणि गुरुजींचे बोलणे ऐकून घेतल्यावर मला २ क्षणांसाठी वाटू लागले कि मी तडक तेथून निघून जावे.
परंतु, इथे परत माझा "म" देवदूत कामी आला. महाभारतात जसा युधिष्ठिराच्या पायाचा अंगठा हलल्या शिवाय भीमाला कोणतीहि कृती करण्याची परवानगी नव्हती, तोच युक्तिवाद मी माझा राग काबूमध्ये ठेवण्यासाठी वापरते.कधीही राग आला कि सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा चेहरा नजरे समोर आणते त्यामुळे शांत राहायला बरीच मदत होते.
सगळा राग/चिडचिड बाजूला ठेऊन क्रिया करण्यात मी लक्ष गुंतवले.ध्यानमग्न असताना जो काही अनुभव आला त्यामुळे मी थोडीशी घाबरून गेले होते. माझ्यात एखादी शक्ती शिरून तिने माझा ताबा घेतलाय असे वाटू लागले.संपूर्ण शरीर खूप गरम आणि दगडाप्रमाणे अगदी निश्चल झाल्यासारखे जाणवत होते. ध्यानातून बाहेर पडल्यावर एवढे थकल्यासारखे वाटत होते कि पुढे काही करण्याची अथवा ऐकण्याची इच्छा उरली नव्हती.माझ्या नशिबाने गुरुजी माझी अवस्था समजून जास्त काही विचारात बसले नाहीत.

शेवटचा दिवस(९ फेब्रु) खूपच मस्त होता. गुरुजींनी आम्हाला २ गटात विभागून फुटसलाड बनवायला सांगितले होते.फुटसलाड बनवायचे म्हणून माझा उत्साह एवढा ओसंडून वाहत होता कि काही देवदूतांनी माझी टिंगल करायला सुरुवात केली.

"कशाला एवढा उत्साह हवाय असल्या छोट्या गोष्टीत?" वगैरे वगैरे.
परंतु मला माहित होते कि मी काय करतेय. इतर मदत करो अथवा न करोत माझच सलाड चांगले असणार याची पक्की खात्री होती.
सगळी तयारी करून दुसऱ्यादिवशी वेळेत पोहोचलो. (आमच्याकडे अपाचे / avenger नसल्याने १० मि उशीर चालतो, लगेच कावू नका गुरुजी )
फुटसलाड बनवायला सुरुवात करण्याआधी गुरुजींनी आणखीन एक गुगली टाकली कि 'सलाड बनविताना चाकू, सुऱ्या असले धार असणारी अवजारे वापरायची नाहीत.' बाकीच्या देवदूतांच्या डोक्यात काय चालू झाले माहित नाही, पण मी खुश होते. कारण माझ्या सलाड मांडणी मध्ये चाकू/सुरी नसल्याने फार काही फरक पडणार नव्हता.सगळे नीट सजवून झाल्यावर जे काही सलाड तयार झाले ते तुम्ही फोटोत पाहू शकता.(माझा उत्साह नक्कीच सार्थकी लागला होता.)

खाऊन झाल्यावर थोडी क्रिया आणि सत्संग करून आमची हि ६ दिवसांची कार्यशाळा पार पडली.सत्संग मधील भजन खूपच सुंदर आणि वेगळी होती.आतापर्यंत हिंदी गाण्यांपलीकडे कधी नाच केला नसल्याने भजन गाताना कसे नाचतात हे मला समजत नव्हते.जमेल तसे नाचून (?) मी ती वेळ मारून नेली (lolzzzzz. )

सर्वात शेवटी सगळ्यांना एक-एक कागद-पेन देण्यात आला.प्रत्येकाने तो कागद आपल्या पाठीवर धरून ठेवायचा आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या कागदावर समोरील व्यक्तीबाबत चांगली गोष्ट लिहायची (फेसबुकची वॉल आमच्या पाठीवर होती.)
हे सर्व करताना जाणवले कि आपल्याला समोरच्या माणसाला नावे ठेवताना शब्द पटकन आठवतात, परंतु चांगले लिहायचे म्हणल्यावर बुद्धीला चालना द्यावी लागते.

.....................................क्रमश: (3)

..................................................................अस्मित (१० मार्च २०१४)

कॅलीडोस्कोप : ८ - Breathing LIFE...................







कॅलीडोस्कोप : ८

Breathing LIFE...................

प्रोत्साहन तर मिळाले पण पुढे काय….

शोध सुरु….

गुगल वर मिळेल ती माहिती शोधून काढली. दुर्दैवाने या आंतरजालावर अद्यावात माहिती उपलब्ध न झाल्याने आणि मी पाठवलेल्या पत्रांना कधीच उत्तर न आल्यामुळे थोडा वेळ वाया गेला.
अचानक, एक दिवस एका मित्राशी बोलत असताना माझा मार्ग मला सापडला.
माझ्या सुदैवाने (मित्राच्या दुर्दैवाने ) त्याच्या सोबत राहणारे त्याचे घर सोबती हि आर्ट ऑफ लिव्हिंगची ६ दिवसांची कार्यशाळा आमच्याच कार्यालयाच्या आवारात सुरु करणार होते.गंगा स्वतःच दारात आल्याने नुसते हातच नव्हे तर पूर्णपणे या अनुभवात स्वतःला झोकून दिले.

गेल्या महिन्यात (४ ते ९ फेब्रु. ) दरम्यान हि ६ दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.इथे मला अजून बरेच देवदूत भेटले. त्यातील महत्वाचे ३ देवदूत म्हणजे देवदूत "य", "त" आणि "प".

आधी या देवदूतांची ओळख करून घेऊ थोडी:

१) "प" : हे आमचे गुरुजी आणि देवदूत पण. यांना भेटल्यावर चांगल्या गोष्टींची सुरुवात झाली याची खात्री पटली. त्यातून हे आमच्या गावचे (सोलापूर) म्हणल्यावर अजून काय हवे या गरीब पामराला? हे स्वतः गेली ६ वर्षे आर्ट ऑफ लिव्हिंगशी निगडीत आहेत (यांचे पूर्ण कुटुंब पण). आता गुरुजी म्हणून, लगेच त्यांना ५०-६० वर्षांचा म्हातारा(?) बनवू नका. एकदम "यंदा कर्तव्य आहे" या गटात बसणारे आहेत.कधीही कसलीही मदत करायला तयार आणि मनमिळावू. ६ दिवस पूर्ण कार्यशाळा संपन्न होई पर्यंत यांनी आमची राहण्याची/जेवणाची सोय "य" देवदूताकडे केली होती.

२) "य" : हा देवदूत आमची दीदी आहे.पूर्ण ६ दिवसात अगदी आपल्याच घरात असल्यासारखे आम्ही ३ लोक राहत होतो. काहीही मागा आणि काहीही करा कोणी अडवत नव्हते. सकाळच्या नाश्त्याला सुकामेवा पासून गरमागरम डोसा पर्यंत सगळ काही ओरपणे चालू होते.वर आणखी कार्यालयात जाताना पण दीदी आम्हाला गाडीने पोचवत होती. खरेतर १५ मिनटांचा चालत जाण्यायोगा रस्ता, पण आमच्या सोबतचे लोक वेळेवर तयार होत नसल्याने नेहमी उशीर होयचा आणि सरतेशेवटी
गाडीने यावे लागायचे.

३) "त" : हा देवदूत म्हणजे आमचा टेडीबियर. २४/७/३६५ दिवस हा फक्त हसत असावा असे वाटते.याने कार्यशाळेत बरीच मदत ("क्रिया" मॉडेलिंग )केली. तरी पण मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्याच्या "अवेन्जर (Avenger)" वरून केलेली छोटी सफर. (:) it was fab )

साधारण संध्याकाळी ६-७ च्या दरम्यान आमची कार्यशाळा सुरु व्हायची.कामामुळे शरीर थकलेलं असल्याने सुरुवातीला उत्साह जरा कमीच होता.त्यात सोबतच्या लोकांचे योग कम माकडचाळे बघता मी आणि माझी मैत्रीण तिथे हास्यक्लब सुरु करायचो. कधीतरी आम्ही आमच्या या सतत हसण्याच्या सवयीमुळे मार खावा लागणार याची खात्री होती, परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. (गुरुजींचा चांगुलपणा आणि संयम; दुसरे काय.... ) इथे शिकविला जाणारा योग किंवा दिले जाणारे उपयोगी ज्ञान या बद्दल आधीच बरीचशी पुस्तके वाचून कोळून प्यायलेलो असल्याने आम्हाला (मी आणि माझी मैत्रीण) "आपण का आलोय येथे?" असा प्रश्न पडलेला.या ज्ञान दानाच्या वेळेस विचारल्या गेलेल्या प्रश्नांना सगळ्यात जास्त बरोबर उत्तरे मी देत होते आणि जास्त चॉकलेट्स पण मीच मिळविली (टाळ्या ).
सुदर्शन क्रिया आणि प्राणायाम करायला सुरुवात केल्यानंतर खऱ्या आनंदाला सुरुवात झाली.क्रिया करून झाल्यावर जाणवले कि एवढा शांत आणि समाधानी अनुभव आपण फार कमीवेळा घेतलेला आहे. (या आधी रेकी करताना मला असे अनुभव आले होते पण ते थोडे कमी आहेत.)

स्वतःची "अशी ओळख" खूपच नवीन आणि आनंददायी होती.

परंतु १-२ दिवसात कामाच्या व्यापामुळे आणि पुरेशी झोप न झाल्याने माझा, या गोष्टीतील सहभाग थोडा कमी होऊ लागला (झोप पूर्ण न होण्याचे मुख्य कारण मैत्रिणी सोबत रात्रभर चालणाऱ्या गप्पा).कार्यशाळा चालू असताना तेथे असणाऱ्या ac मुळे माझा घसा जो खराब झाला तो पूर्ण बारा व्हायला २-३ आठवडे लागले आणि भरपूर वेगवेगळ्या औषधांचा मारा करावा लागला.तरीसुद्धा ठरवून क्रिया करत राहिले कारण "म" आणि "ज" ला केलेले प्रॉमिस तोडायचे नव्हते.

हे सगळे छान अनुभव घेत असताना खरी मजा आली ती ७ फेब्रु ला. इतके दिवस इतक्या चांगल्या गोष्टी शिकत असताना २ देवदूतांच्या छोट्याश्या चुकीमुळे ("प" आणि "अ" चे चुकीचे संयोजन वादाला कारणीभूत होते) जो काही मजेशीर किस्सा घडला ते आठवले कि अजूनही मी हसत राहते. जिथे अहंकार बाजूला ठेऊन परमात्म्याशी एकरूप होण्याच्या गोष्टी शिकल्या त्याच्या दुसऱ्याच क्षणाला हे असे काही घडेल याची अपेक्षा नव्हती केली. मी सोयीस्करपणे त्या वादातून काढता पाय घेतला होता. कारण एकच, जिथे मी आभार मानताना सुद्धा वाद टाळते (धन्यवाद ऐवजी नुसतेच "धन्यु" म्हणते) तेथे मी इतक्या शुल्लक गोष्टीत का लक्ष घालावे???

मी माझ्या परीने त्या प्रश्नाचा निकाल लावला होता.

.....................................क्रमश: (२)

..................................................................अस्मित (५ मार्च २०१४)

कॅलीडोस्कोप : ७ - Breathing LIFE...................




कॅलीडोस्कोप : ७

Breathing LIFE...................

खरेतर हा लेख लिहिण्यासाठी मला थोडं मागे जावं लागेल.
थांबा थांबा!! मागे म्हणजे आहे त्या जागेवरून मागे, किंवा फुटबॉल आणि क्रिकेट खेळताना चेंडू मारण्या/फेकण्याआधी जो काही पवित्रा घेतला घेतला जातो तसे मागे नव्हे. तर सिनेमामध्ये Flashback दाखवतात तसा भूतकाळ आणि वर्तमानाचा खेळ.

३-४ वर्ष मागे......

हा लेख आहे माझ्या तामसी (?) आयुष्याचा अध्यात्माकडे वळण्याच्या संदर्भाचा.
लेख वाचून मला आस्तिक - नास्तिक, चांगली-वाईट असे ट्याग लावू नका.कारण या संकल्पनांशी मी वाद घालत बसत नाही. माझं आणि त्याचं जे काही, आणि जसे काही नाते आहे तेवढे माझ्यासाठी पुरेसं आहे.

तर, मी माझ्या आयुष्याला स्वतःच्या मर्जीनुसार जगायला सुरुवात केली तेव्हांपासूनचा हा प्रवास चढ-उतार,डोंगर - दऱ्या, काळ-गोर सर्वकाही असणारा.स्वतःच्या मर्जीनुसार आयुष्य अनुभवत, जे काही चांगले/ वाईट घडेल त्याची पूर्णपणे जबाबदारी घेत स्वतःला घडवत जाणे.काही पश्चातापाचे क्षण,पण त्याच सोबत मान ताठ ठेऊन जीवनाला सामोरी जाण्याची हिंमत असलेला.
इतर सामान्य माणसांप्रमाणे भौतिक सुखाचा आनंद घेत जगत (?)असताना स्वतःची खरी ओळख कधी गळून पडली हे समजायला बराच वेळ लागला. (भौतिक सुखाच्या प्रत्येकाच्या वेगळ्या व्याख्या असतात. प्रत्येकाने आपली तपासावी.)मित्र म्हणवणारे लोक मैत्री जाणणारे नव्हते,पैसा पायाला प्रकाशवेग लावून होता.एकंदर काय तर मनापासून सुखी, आनंदी नव्हते.कुठेही असले तरी फक्त एकच जाणवत राहायचे "काहीतरी कमी आहे". गर्दीतील एकटेपण बरेचदा आनंददायी असले
तरी कधीतरी ते सुद्धा रातकिड्या प्रमाणे लपून सतत कर्कश्श अस्तित्वाची जाणीव करून द्यायचे.

एकदिवस हे सगळे थांबवायचेच हे ठरवून नव्याने सुरुवात केली. नवीन नोकरी, नवीन जागा, नवे लोक आणि परत एकटीनेच स्वतःचा शोध घेऊ लागले.या नवीन रस्त्यावर पहिलीच व्यक्ती भेटली ती नक्कीच देवाने ठरवून माझ्यासाठी पाठवलेली होती.या व्यक्तीला आपण "देवदूत म" असे नाव देऊया, म्हणजे पुढे लेखभर संदर्भ व्यवस्थित लागतील. या "म "देवदूताने माझे आयुष्य अगदी ३६०
गुणिले कितीतरी अंश/कोनातून बदलून टाकले. परत पहिल्यासारखी माझ्यातील "मी" जिवंत झाले. कविता लिहिणे, गाणी ऐकणे आणि आयुष्य जगणे सुरु झाले. यात सर्वात महत्वाची एक गोष्ट झाली ती म्हणजे माझे त्या आदिम शक्तीशी असलेले भांडण कमी होऊ लागले. आणि सुरु झाला तो अध्यात्माचा एक सुंदर अनुभव.

ज्या गोष्टी आजवर टाळल्या त्याच गोष्टींनी खरा आनंद अनुभवायला मिळाला. यामध्ये रोज सकाळी पाठ वाचन,प्राणायाम, सुदर्शन क्रिया सर्वकाही मिसळून गेले.

एक मिनिट "हि सुदर्शन क्रिया कुठून आली मधेच???" …

अहो तीच तर खरी गम्मत आहे. इथे एंट्री झाली ती अजून एका "देवदूत ज" ची. या दोन्ही "म आणि ज" देवदूतांनी मिळून मला हि क्रिया शिकून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.

तेथून एका द्वैताचा अद्वैताकडे बदल सुरु झाला.

.....................................क्रमश: (१)

..................................................................अस्मित (४ मार्च २०१४)

कॅलीडोस्कोप : ६ - नाट्याची नाटकीयता




कॅलीडोस्कोप : ६

नाट्याची नाटकीयता

अलीकडे पुण्याच्या सामाजिक/व्यावसायिक रंगभूमीवर "योनी" या "विषयाशी" संबंधित नाटके येऊ लागली आहेत, त्यातीलच हे एक नाटक: "Vagina the shadow of a lady" अर्थात "त्या चार योनींची गोष्ट".
परंतु नाटकाचा विषय चांगला वाटला म्हणून सहपरिवार नाटक पाहायला गेलो आणि कंटाळून घरी आलो.नाटकाच्या कथे पासून ते नेपथ्य, संवाद, दिग्दर्शन अशा या ना त्या बाबतीत टाळता येण्यासारख्या चुका होत्या.

नाटक सुरु होण्याआधी, नाटकाविषयी माहिती देताना जी काही २-३ मिनिटांची बडबड केलीये ती इतकी "नाटकी" होती कि नाटक पाहायला आलोय कि वकृत्व स्पर्धा याचा पेच निर्माण व्हावा.(हीच बोलण्याची स्टाईल नाटकाच्या उत्तरार्धात "कामदेवी" नावाच्या पात्राच्या तोंडी आहे - कारण २ हि पात्रे एकाच व्यक्तीने रंगविली आहेत).
या नाटकाची कथा ५ मैत्रिणींच्या किटी पार्टी पासून सुरु होते.या मैत्रिणींचे वय साधारण १८ वर्षापासून पुढे असावे कारण, त्या मध्ये काही जणी १५ ते २० वर्षांचा लग्नाचा अनुभव असलेल्या, तर एक जण "कीस केल्याने मुले होतात का?" असा निरागस प्रश्न विचारणारी आहे.(वयात एवढे अंतर असूनसुद्धा ती "निरागस" मुलगी या बायकांसोबत किटी पार्टीत कशी काय? असे प्रश्न विचारायचे नाहीत).
अपेक्षेप्रमाणे या कथेत एका स्त्री लग्नाला २० वर्षे होऊन पण शारीरिक पातळीवर सुखी नाही, दुसरीवर लहानपणीच बलात्कार झालेला म्हणून पुरुषांचा द्वेष करणारी, तिसरी गावातून लग्न करून फसवून आणलेली आणि वेश्या झालेली आणि चौथी मोलकरीण अशी पात्रे आहेत. या पात्रांचा अंदाज आधीच आल्यामुळे नाटकात पुढे काय घडणार आणि काय संवाद असतील हे कोणालाही समजू शकेल. त्यातून हे नाटक सादर होत होते ते खुद्द पुण्यात आणि पुण्याच्या रसिकांबद्दल मी तुम्हाला वेगळे काय सांगणार…?

मूळ कथा, प्रकाशयोजना यामध्येच उणीवा असल्याने कलाकारांच्या स्टेजवरील चुकांकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करता येत नव्हते.स्टेजवर अडखळणे, विंगेत कोणाचातरी मोबाईल वाजून माईकवर खरखर आवाज येणे, sexologist पात्राने एकदाही प्रेक्षकांकडे पाहून संवाद न म्हणणे या अशा खूप साऱ्या चुका हे नाटक चालू असताना घडत होत्या.

नाटकातील मोलकरीण सिल्कची साडी घालून घरकाम करायला आलेली दाखविली आहे (साधी साडी असती तर ते पात्र मोलकरीण तरी वाटले असते).१५ दिवसांनी उगवल्या नंतरही आधी घरभर नाचून "तुमचे घर किती छान आणि मोठे आहे" हे मालकिणीला सांगत राहते. १५ दिवसात घर बदलले कि मोलकरीण काहीच कळत नाही.वर आणखीन काम न करता ती मोलकरीण मालकिणीच्या बेडरूम मधील वेगवेगळी चित्रे आणि मासिके यांच्या बद्दल बोलून स्वतःच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलून निघून जाते.जणू काही ती फक्त तेवढेच बोलण्यासाठी एवढे दिवसांनी उगविली होती. अशा या मोलकरणीला " तू पैसे साठवून, एक पूर्ण दिवस नवऱ्यासोबत बाहेर भटकून एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन समागम करावेस " असा सुज्ञ सल्ला तिच्या मालकीणबाई देतात.

नाटकाच्या शेवटी कामदेवीला प्रार्थना करून स्टेजवर प्रकट केले आहे. हि देवी "स्त्री जेव्हां शरीरसुखाच्या अत्युच्य शिखरावर असते तेव्हां कसे आवाज काढते आणि पुरुषांनी आपली स्त्री संपूर्ण उद्दीपित झाली कि नाही हे कसे ओळखावे याचे ज्ञान ५ वेगवेगळे आवाज ऐकवून देते" (ध्वनीमुद्रित आवाज). खरेतर या आवाज ऐकविण्याचा लोकांना नाटकाकडे आकर्षित करण्याचा हेतू असावा.

हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यापेक्षा आधी जर का नाट्य स्पर्धांमधून दाखविले गेले असते तर दिग्दर्शकाला आपल्या नाटकात काय कमी आहे हे तरी समजले असते.

स्त्रियांना नेहमी रडक्याच का दाखवितात काही समजत नाही.

................अस्मित (4th Jan 2014)

"कॅलिडोस्कोप"............५ " - Mr.& Mrs. Nosy




"कॅलिडोस्कोप"............५ "

Mr.& Mrs. Nosy

लिखाणाचा विषय तसा गंभीर आहे. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण आपल्याकडे याचे गांभीर्य फार कमी लोकांना जाणवते.
गेले काही वर्ष आणि विशेषत:या वर्षातील सगळे दिवस, अशी एकतरी व्यक्ती मला भेटते जिला माझ्या लग्नाची अत्यंत काळजी लागलेली असते (ha hah ha).
(त्यात निम्म्याहून जास्त पुरुष मंडळी आहेत.) तर अशा तमाम काळजीवाहू मंडळीना (स्त्री/ पुरुष दोन्ही) माझे काही प्रश्न आहेत :
१. लग्न म्हणजे नेमके काय? तुमचे लग्नाविषयी प्रामाणिक विचार.
२. तुमच्या आयुष्यात तुम्ही खरच फक्त तुमच्याच साथीदारावर प्रेम केलंय आणि खऱ्या अर्थाने वैवाहिक आयुष्य सुखी केलंय?
३. तुमच्यातील कितीजण एकटे विवाहित आहात? (हा प्रश्न बहुदा स्त्रियांना लागू पडतो.) इ. अजून बरेच प्रश्न आहेत, पण सध्या या प्रश्नांची उत्तरे स्वतःला तरी प्रामाणिकपणे देऊन पहा जमलीतर.

हे काळजीवाहू लोक पाहिले (B-) ), कि मनात विचार येतो, कि हे लोक स्वतः संसारात सुखी नाहीत, काहींचे घटस्फोट झालेले आहेत तर काही स्वतः अविवाहित आहेत.तरीसुद्धा यांना दुसऱ्यांच्या लग्नाची एवढी का बरे काळजी???
यांना नक्की त्रास कशाचा होत असतो?
मी माझे आयुष्य, माझ्या मनानुसार, पटेल त्या गोष्टी करून आनंदाने जगते याचा यांना इतका का त्रास व्हावा? (:O) कि मी एखाद्या पुरुषावर अवलंबून नाही म्हणून दु:ख यांना होते?

माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया बरेचदा मला "तू लग्न न करून किती सुखी आहे" यावर प्रवचन देतात आणि हेवा हि करतात. फावल्या वेळात स्वतःच्या (आणि कधी कधी दुसऱ्यांच्या) नवरे मंडळी आणि सासरच्यांना मनसोक्त शिव्या घालतात.
अशावेळी मी फक्त हसत असते, या लोकांवर नाही तर, ज्यांना स्वतःला अजून लग्न म्हणजे काय हे समजलेले नाही असे लोक दुसऱ्याच्या लग्नाविषयी किती आपुलकीने (??)आणि अधिकारवाणीने बोलतात. ज्यांना "कायद्याने परवानगी मिळते आणि कायमचे हक्काचे माणूस" फक्त यासाठीच लग्न करायचे असते त्यांना संसार म्हणजे नक्की काय हे कसे कळावे?

मी आजवर ज्या काही लग्नाळू लोकांना भेटले त्यातील बऱ्याच मुलांना लग्नाविषयी स्वतःचे काही विचार नव्हते. फक्त समाज आणि आई-वडील यांच्यासाठी लग्नाच्या बाजारात उभी असलेली हि फक्त बुजगावणी होती.अशा लोकांनी लग्न न करणे म्हणजेच समाजावर खरे उपकार होणार नाहीत का?
यांच्या कुटुंबाला आयटी क्षेत्रात काम करणारी मुलगी, गलेलठ्ठ पगार असणारी,सुंदर सुस्वरूप हवी असते. त्यात अजून तिने घरी भाकरी बनविणे, रांगोळी काढणे, आल्यागेल्याचे सगळे करणे हे पण आलेच. या तमाम लोकांना माझी विनंती आहे कि, घरून निघताना आधी स्वत:चे अमिबा सारखे वेडेवाकडे वाढलेले शरीर पाहत जा. जेवढ्या काही अपेक्षा आहेत त्यातील किती गोष्टी तुम्हाला स्वतःला करता येतात किंवा तुमच्याकडे त्या आहेत? तुम्ही किती पैसे कमावता? तुम्ही तुमच्या सासू- सासरे आणि नातेवाईकांची किती काळजी घेतली आहे? मुले दारू सिगरेट पिणारी असताना सुना कशाला सोज्वळ हव्यात? या सर्व गोष्टी तपासून घ्या.
त्यामुळे लोकांचा वेळ,पैसा, श्रम सगळे काही वाचेल.आणि तुम्ही निघून गेल्यावर मुली तुमचा जो उद्धार करतात तो थांबेल.

व. पु च्या वाक्याप्रमाणे "खरा संसार फक्त एका दिवसाचा आणि एका रात्रीचा असतो बाकी उरते ती फक्त त्याची पुनरावृत्ती". दुसऱ्यांच्या लग्नाची काळजी करण्यापेक्षा स्वतःचे संसार सुखी करण्याचा प्रयत्न करा, निदान उरलेली वर्षे तरी सुखात जातील.तुमच्या मुलाबाळांवर चांगले संस्कार तरी होतील.यासाठी मंगला सामंत यांचे "विवाह : भ्रमातून भानावर " हे पुस्तक नक्की वाचा.
लग्न आणि विवाह संस्था या विषयीचे समाजाचे विचार कधीतरी सुधारतील अशी अपेक्षा करते.

…………………. अस्मित. (11-11-13)