कॅलीडोस्कोप : ७
Breathing LIFE...................
खरेतर हा लेख लिहिण्यासाठी मला थोडं मागे जावं लागेल.
थांबा थांबा!! मागे म्हणजे आहे त्या जागेवरून मागे, किंवा फुटबॉल आणि क्रिकेट खेळताना चेंडू मारण्या/फेकण्याआधी जो काही पवित्रा घेतला घेतला जातो तसे मागे नव्हे. तर सिनेमामध्ये Flashback दाखवतात तसा भूतकाळ आणि वर्तमानाचा खेळ.
३-४ वर्ष मागे......
हा लेख आहे माझ्या तामसी (?) आयुष्याचा अध्यात्माकडे वळण्याच्या संदर्भाचा.
लेख वाचून मला आस्तिक - नास्तिक, चांगली-वाईट असे ट्याग लावू नका.कारण या संकल्पनांशी मी वाद घालत बसत नाही. माझं आणि त्याचं जे काही, आणि जसे काही नाते आहे तेवढे माझ्यासाठी पुरेसं आहे.
तर, मी माझ्या आयुष्याला स्वतःच्या मर्जीनुसार जगायला सुरुवात केली तेव्हांपासूनचा हा प्रवास चढ-उतार,डोंगर - दऱ्या, काळ-गोर सर्वकाही असणारा.स्वतःच्या मर्जीनुसार आयुष्य अनुभवत, जे काही चांगले/ वाईट घडेल त्याची पूर्णपणे जबाबदारी घेत स्वतःला घडवत जाणे.काही पश्चातापाचे क्षण,पण त्याच सोबत मान ताठ ठेऊन जीवनाला सामोरी जाण्याची हिंमत असलेला.
इतर सामान्य माणसांप्रमाणे भौतिक सुखाचा आनंद घेत जगत (?)असताना स्वतःची खरी ओळख कधी गळून पडली हे समजायला बराच वेळ लागला. (भौतिक सुखाच्या प्रत्येकाच्या वेगळ्या व्याख्या असतात. प्रत्येकाने आपली तपासावी.)मित्र म्हणवणारे लोक मैत्री जाणणारे नव्हते,पैसा पायाला प्रकाशवेग लावून होता.एकंदर काय तर मनापासून सुखी, आनंदी नव्हते.कुठेही असले तरी फक्त एकच जाणवत राहायचे "काहीतरी कमी आहे". गर्दीतील एकटेपण बरेचदा आनंददायी असले
तरी कधीतरी ते सुद्धा रातकिड्या प्रमाणे लपून सतत कर्कश्श अस्तित्वाची जाणीव करून द्यायचे.
एकदिवस हे सगळे थांबवायचेच हे ठरवून नव्याने सुरुवात केली. नवीन नोकरी, नवीन जागा, नवे लोक आणि परत एकटीनेच स्वतःचा शोध घेऊ लागले.या नवीन रस्त्यावर पहिलीच व्यक्ती भेटली ती नक्कीच देवाने ठरवून माझ्यासाठी पाठवलेली होती.या व्यक्तीला आपण "देवदूत म" असे नाव देऊया, म्हणजे पुढे लेखभर संदर्भ व्यवस्थित लागतील. या "म "देवदूताने माझे आयुष्य अगदी ३६०
गुणिले कितीतरी अंश/कोनातून बदलून टाकले. परत पहिल्यासारखी माझ्यातील "मी" जिवंत झाले. कविता लिहिणे, गाणी ऐकणे आणि आयुष्य जगणे सुरु झाले. यात सर्वात महत्वाची एक गोष्ट झाली ती म्हणजे माझे त्या आदिम शक्तीशी असलेले भांडण कमी होऊ लागले. आणि सुरु झाला तो अध्यात्माचा एक सुंदर अनुभव.
ज्या गोष्टी आजवर टाळल्या त्याच गोष्टींनी खरा आनंद अनुभवायला मिळाला. यामध्ये रोज सकाळी पाठ वाचन,प्राणायाम, सुदर्शन क्रिया सर्वकाही मिसळून गेले.
एक मिनिट "हि सुदर्शन क्रिया कुठून आली मधेच???" …
अहो तीच तर खरी गम्मत आहे. इथे एंट्री झाली ती अजून एका "देवदूत ज" ची. या दोन्ही "म आणि ज" देवदूतांनी मिळून मला हि क्रिया शिकून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
तेथून एका द्वैताचा अद्वैताकडे बदल सुरु झाला.
..........................
..........................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा