शनिवार, २६ एप्रिल, २०१४

कॅलीडोस्कोप : ६ - नाट्याची नाटकीयता




कॅलीडोस्कोप : ६

नाट्याची नाटकीयता

अलीकडे पुण्याच्या सामाजिक/व्यावसायिक रंगभूमीवर "योनी" या "विषयाशी" संबंधित नाटके येऊ लागली आहेत, त्यातीलच हे एक नाटक: "Vagina the shadow of a lady" अर्थात "त्या चार योनींची गोष्ट".
परंतु नाटकाचा विषय चांगला वाटला म्हणून सहपरिवार नाटक पाहायला गेलो आणि कंटाळून घरी आलो.नाटकाच्या कथे पासून ते नेपथ्य, संवाद, दिग्दर्शन अशा या ना त्या बाबतीत टाळता येण्यासारख्या चुका होत्या.

नाटक सुरु होण्याआधी, नाटकाविषयी माहिती देताना जी काही २-३ मिनिटांची बडबड केलीये ती इतकी "नाटकी" होती कि नाटक पाहायला आलोय कि वकृत्व स्पर्धा याचा पेच निर्माण व्हावा.(हीच बोलण्याची स्टाईल नाटकाच्या उत्तरार्धात "कामदेवी" नावाच्या पात्राच्या तोंडी आहे - कारण २ हि पात्रे एकाच व्यक्तीने रंगविली आहेत).
या नाटकाची कथा ५ मैत्रिणींच्या किटी पार्टी पासून सुरु होते.या मैत्रिणींचे वय साधारण १८ वर्षापासून पुढे असावे कारण, त्या मध्ये काही जणी १५ ते २० वर्षांचा लग्नाचा अनुभव असलेल्या, तर एक जण "कीस केल्याने मुले होतात का?" असा निरागस प्रश्न विचारणारी आहे.(वयात एवढे अंतर असूनसुद्धा ती "निरागस" मुलगी या बायकांसोबत किटी पार्टीत कशी काय? असे प्रश्न विचारायचे नाहीत).
अपेक्षेप्रमाणे या कथेत एका स्त्री लग्नाला २० वर्षे होऊन पण शारीरिक पातळीवर सुखी नाही, दुसरीवर लहानपणीच बलात्कार झालेला म्हणून पुरुषांचा द्वेष करणारी, तिसरी गावातून लग्न करून फसवून आणलेली आणि वेश्या झालेली आणि चौथी मोलकरीण अशी पात्रे आहेत. या पात्रांचा अंदाज आधीच आल्यामुळे नाटकात पुढे काय घडणार आणि काय संवाद असतील हे कोणालाही समजू शकेल. त्यातून हे नाटक सादर होत होते ते खुद्द पुण्यात आणि पुण्याच्या रसिकांबद्दल मी तुम्हाला वेगळे काय सांगणार…?

मूळ कथा, प्रकाशयोजना यामध्येच उणीवा असल्याने कलाकारांच्या स्टेजवरील चुकांकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करता येत नव्हते.स्टेजवर अडखळणे, विंगेत कोणाचातरी मोबाईल वाजून माईकवर खरखर आवाज येणे, sexologist पात्राने एकदाही प्रेक्षकांकडे पाहून संवाद न म्हणणे या अशा खूप साऱ्या चुका हे नाटक चालू असताना घडत होत्या.

नाटकातील मोलकरीण सिल्कची साडी घालून घरकाम करायला आलेली दाखविली आहे (साधी साडी असती तर ते पात्र मोलकरीण तरी वाटले असते).१५ दिवसांनी उगवल्या नंतरही आधी घरभर नाचून "तुमचे घर किती छान आणि मोठे आहे" हे मालकिणीला सांगत राहते. १५ दिवसात घर बदलले कि मोलकरीण काहीच कळत नाही.वर आणखीन काम न करता ती मोलकरीण मालकिणीच्या बेडरूम मधील वेगवेगळी चित्रे आणि मासिके यांच्या बद्दल बोलून स्वतःच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलून निघून जाते.जणू काही ती फक्त तेवढेच बोलण्यासाठी एवढे दिवसांनी उगविली होती. अशा या मोलकरणीला " तू पैसे साठवून, एक पूर्ण दिवस नवऱ्यासोबत बाहेर भटकून एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन समागम करावेस " असा सुज्ञ सल्ला तिच्या मालकीणबाई देतात.

नाटकाच्या शेवटी कामदेवीला प्रार्थना करून स्टेजवर प्रकट केले आहे. हि देवी "स्त्री जेव्हां शरीरसुखाच्या अत्युच्य शिखरावर असते तेव्हां कसे आवाज काढते आणि पुरुषांनी आपली स्त्री संपूर्ण उद्दीपित झाली कि नाही हे कसे ओळखावे याचे ज्ञान ५ वेगवेगळे आवाज ऐकवून देते" (ध्वनीमुद्रित आवाज). खरेतर या आवाज ऐकविण्याचा लोकांना नाटकाकडे आकर्षित करण्याचा हेतू असावा.

हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यापेक्षा आधी जर का नाट्य स्पर्धांमधून दाखविले गेले असते तर दिग्दर्शकाला आपल्या नाटकात काय कमी आहे हे तरी समजले असते.

स्त्रियांना नेहमी रडक्याच का दाखवितात काही समजत नाही.

................अस्मित (4th Jan 2014)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: