सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२




माझी जपान सफर - ७

एका शनिवारी आम्ही ऑफिस मधील मराठी लोकांनी एनोशिमा नावाच्या टापूवर जायचे ठरवले.
सकाळी १० ला निघायचे होते. आम्ही मुली बरोबर १० ला तयार होऊन बसलो तर, मुलांनी अर्धा तास उशीर लावला निघायला [कोण म्हणाल रेमुली वेळ लावतात आवरायला.....?]
आता सुरुवातच अशी झाली म्हंटल्यावर पुढे की होणार.......[खरेतर काही झाले नाही...आमचा प्रवास सुखाचा झाला :)]
आम्ही सगळ्यांसाठी खायला म्हणून सफरचंद,बिस्किट्स वगैरे गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या, त्यामुळे बॅग खूपच जड झाली होती.
२ ट्रेन बदलत आम्ही एकदाचे तिथे पोहोचलो. एनोशिमा हा एक ४ किलो.मि. परिसरात "कातासे" नावाच्या नदीवर पसरलेला टापू आहे. आम्ही पोहोचलो त्यावेळी तेथे बोटीची शर्यत चालू होती. दुसरीकडे लोक पाण्यात चालणारी मोटोरबाईक घेऊन एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत,एकमेकांना पाण्यात पाडत [पाण्यात पाहत नव्हे] मस्त खेळत होते. एक जपानी मुलगी ती पाण्यातील बाईक चालवायचा खूप प्रयत्न करत होती. परंतु ती सारखी पाण्यात पाडत होती. या बाईक चालवणे तसे खूप अवघड वाटत होते. कारण पाण्याला खूप प्रवाह होता आणि त्या बाईकच्या पायाला नीट आधार नव्हता, त्यामुळे लोक पाण्यात पडत होते.
हे सर्व पाहत असताना अचानक लक्ष समोरच्या डोंगर रांगांकडे गेले आणि ज्याची इतके वर्ष नुसती कौतुके ऐकली होती तो; जपानी लोकांचा देवासमान पुजला गेलेला "फुजी" पर्वत दिसला.मी श्वास रोखून नुसते त्या पर्वताकडे पहात राहिले. डोंगराच्या माथ्यावर थोडे बर्फ साचून तो पांढरा शुभ्र होऊन उन्हाने मस्त चमकत होता.कितीही फोटो काढले तरी प्रत्यक्षात तो अनुभव घेणे खरेच थक्क करून सोडणारे आहे.[मला ऑफिसला जाताना रोज फुजी पर्वत दिसतो आणि मी रोज त्याच उत्साहाने त्याला पाहते. रोज नित्य नवा होऊन भेटतो तो आपल्याला.]
पुढे गेल्यावर वर जाताना एका छोट्या बाजार पेठेतून जावे लागते.येथे खूप सारी सागरी वस्तूंची दुकाने, छोटे हॉटेल्स पाहायला मिळतात [अहो, म्हणजे तुम्ही खाऊ पण शकता तिथे...आपल कामच ते]
येथे खूप सारे समुद्रातील प्राणी तव्यावर दिसले. शिंपले, ऑक्टोपस, माशांची पिल्ले, माशांची अंडी,कासवे सगळे काही होते.
इथे कासवाची कवचे, शंख-शिंपले, माशांची कवचे असे खूप काही दुकानातून विकायला होते. एकेठिकाणी ऑक्टोपसला खूप प्रेशर देऊन त्याचा पापड बनवून विकत होते. तसच कोलंबी चे पापड पण.
या टापूवर ३ देवी "भूमाता, सागरी दळणवळण आणि मच्छी"अशांना पूजले जाते. बेनझाईतेन [裸弁財天]" नावाची खूप प्रसिध्द [संगीत आणि मनोरंजनाची] देवी पुजली जाते. तिची मूर्ती चीनची आहे असे मानतात आणि ती मूर्ती पूर्ण नग्न बसलेल्या अवस्थेत एक जपानी वाद्य वाजवताना आहे. येथे "पवित्र पाणी" म्हणून एक छोटे दगडी टाके असते,त्यातील पाणी आपल्याकडील देवटाक्या प्रमाणे थंड असते. देवळात जाण्याआधी सगळेजण त्या पाण्याने हात धुवून मग देवळात जातात.कोणत्याही शिंतो देवळात जाण्यासाठी या पाण्याने स्वतःला पवित्र करून मगच देवळात प्रवेश करायचा असतो. हात धुण्याची पद्दत पण ठरलेली आहे. आधी उजव्या हातात ओरगले पकडून डावा हात धुवायचा मग उजवा हात धुवायचा. त्यानंतर तोंडात थोडे पाणी घेऊन ते पाणी थुंकून टाकायचे. पुढे देवळात प्रवेश करून तेथील घंटा वाजवायची. हे घंटा वाजवणे प्रकरण पण अवघड वाटते [मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे...] कारण ती घंटा खूप वर बांधलेली असते आणि त्याची दोरी ओढताना खूप कष्ट घ्यावे लागतात. बरेचदा नुसती दोरी हलते, घंटा वाजत नाही [मला वाजवता आली.... म्हणजे मी पवित्र मनाने गेले होते यात शंकाच नाही :)] लोक देवळात चप्पल घालूनच प्रवेश करतात. उदबत्ती लावतात आणि हातावर हात मारून आवाज करत मग नमस्कार करतात.येथे लोक आपल्या प्रियजनांच्या नावाने एक इच्छा मनात धरून कागदाची चिट्ठी देवळाबाहेर बांधतात.एका देवळात छतावर कासवाचे चित्र काढलेले आहे. ते चित्र होईत्सू साकी नावाच्या व्यक्तीने काढलेले आहे. ते कासव ८ दिशांमध्ये कुठूनही पहा, आपल्याकडेच पाहतंय असे वाटते.
ज्यांना टापू चढून जायचा नाही त्यांच्यासाठी सरकता जिना उपलब्ध आहे. या टापूवर पाहण्यासाठी बॉटनिकल गार्डन, लाईट हाउस,संग्रहालय असे बरेच काही आहे.येथे येणारी लोकांचे मनोरंजन करायला अनेक हौशी कलाकार आपली कला सादर करताना आढळतात.
पुढे एके ठिकाणी पहिल्या १०० लोकांना जपानी नुडल्स फक्त १०० येन मध्ये विकत होते.आम्ही ते जपानी जेवण अर्थातच खाल्ले नाही. कारण यांच्या रस्त्यावर गटाराचे,कचर्याचे घन वास येत नसतील एक वेळ, पण जेवणाचा वास भयंकर असतो.
लाईट हाउसवर गेल्यावर समुद्राचे खूप विहंगम दृश दिसते.हा टॉवर ६० मी.उंच आहे.
लहान मुलांसाठी येथे लांब फुग्याची [आपल्याकडे ते काकडी फुगे असतात तसे....] वेगवेगळी खेळणी बनवून देत होते. एकाकडे फुग्याची टोपी, तर दुसरा फुग्या पासून बनवलेली पॅंट आणि त्याला तलवार लाऊन हिंडत होता. एकंदर सगळे खुश होते आणि आनंद लुटत होते.काही लोक सर्फिंग, बोटिंग करताना आढळतात. काही लोक आकाशात पॅराग्लाइडिंग करताना आढळले.
फिरायला आलेले अनेक लोक आपली कुत्री घेऊन आले होते. त्यांना [म्हणजे कुत्र्यांना] कडेवर घेऊन मस्त हिंडत होते.एकही कुत्रा भुंकून त्रास देत नव्हता कोणाला. येथील मांजरी खूपच गब्दुल होत्या. आणि त्या पण तशाच शांत. कमाल वाटते या प्राण्यांची....जिवंतपणाची लक्षणे अजिबात जाणवत नाहीत यांच्यात.
या टापूवर ६००० वर्षांपासून सुमुद्राच्या भारती ओहोटीमुळे तयार झालेल्या गुहा आहेत.त्यांना "एनोशिमा इवाया केव्स" असे म्हणतात.या गुहांमध्ये दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. मला तिथे आपल्याकडील त्रिमूर्ती सारखी एक मूर्ती दिसली.एका बाजूला कुकाइ प्रिस्ट, दुसरीकडे कोंगो [वज्रधातू], ताईझो [गर्भकोश. या गुहेबद्दल येथील लोक असे म्हणतात कि ; या गुहेच आकार स्त्रीच्या योनीच्या आकारा प्रमाणे आहे.] अश्या गुहा आहेत.दुसर्याबाजूला तोंडाने आग ओकणारा ड्रॅगन, ऐतिहासिक चित्रे आहेत.या गुहांमधून पाणी टपकत असले तरी जपानी लोकांनी प्लास्टिकच्या पट्ट्या लाऊन ते व्यवस्थित अडवल्यामुळे आपल्या अंगावर पाणी, बारीक माती पडत नाही.गुह्नाची उंची कमी असल्यामुळे वाकूनच चालावे लागते. डोक्याला दगड लागू नयेत म्हणून स्पंज आणि रबरचे जाड पडदे बसवल्याने आपण सुरक्षित असतो.
गुहांमधून ऐरवी येतो तसा कुबट घाण वास अजिबात येत नाही.
येथे एक "लव बेल" नावाची जागा होती. ती बेल वाजवून आपल्या प्रेमासाठी प्रार्थना करायची म्हणे....
परत फिरताना आम्ही तेथील बाजारपेठेत खरेदी केली आणि सागर किनारी येऊन बसलो.
पाणी खूपच थंड होते आणि वार्यामुळे आणखीनच थंडी वाजत होती.
किनाऱ्यावरची रेती काळ्या रंगाची होती. शिंपले आणि शंखांचे थोडे वेगळे प्रकार येथे पाहायला मिळाले.
सांगायची गोष्ट म्हणजे येथे खूप प्रमाणात घारी होत्या. आमच्या एका मित्राने त्यांचे खूप सुंदर आणि खूप जास्त [जवळ जवळ १५० फोटो] काढलेत.
अश्या प्रकारे आमची हि ट्रीपछान झाली. परंतु उशीर झाल्याने आम्हाला डॉल्फिन्स चा शो पाहता नाही आला.
तो आता पुढच्या ट्रीपला...........
.............................................अस्मित [२९ ऑक्टो २०१२ जपान]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: