गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२




माझी जपान सफर - ४
आम्हाला ज्या हॉटेल मध्ये राहायला खोली दिली होती ते बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशन पासून १-२ मिनटांच्या अंतरावर आहे.
पण जपानी माणसाच्या गाडीचे हॉर्न्स अजिबात न वापरण्याच्या सवयी मुळे आणि रूम व्यवस्थित साउंड प्रूफ असल्याने मला आवाजाचा त्रास अजिबात जाणवत नाही.
खरेतर इथे आवाजाचा कसला त्रासच नाही. येथील लोक चुकून किंवा टाइमपास म्हणून देखील हॉर्न वाजवत नाही. आवाज फक्त आला तर ambulance चा
[नोट :  आपल्याकडील लोकांनी जपान मध्ये गाडी चालवण्या आधी विचार करावा...जपान कि हॉर्न?]
सगळीकडे रस्त्याने पाट्या वाचता येतील अश्या लावलेल्या. कुठेही रस्त्यात कागद, कचरा अथवा झाडाची पाने सुद्धा पडलेली दिसत नाहीत.
परंतु त्यांच्या एवढ्या स्वच्छतेमुळे बिचारे पाऊस पडल्यावर येणारा "मातीचा सुगंध" काय आणि कसा असतो या स्वर्गीय अनुभवला मुकले [आम्ही भारतीय सुदैवी, कारण आमच्या पायाला अजूनही माती आहे :) ]
इथला पाऊसही मजेशीर आहे. बिचारा दिवसभर पडतो पण कोसळणाऱ्या पावसाचे सुख देत नाही. तोही जपानी माणसा सारखा पद्धतशीर. या पावसात भिजण्याचा खरा आनंद नाही :(
पाऊस कसा मस्त कोसळणारा आणि सगळी मरगळ उतरवून कांदा भजी आणि अर्धा चहाची तल्लफ जागवणारा हवा, तेहि कळकुटट टपरी आणि फुटका रेडियो सोबतच.
इकडच्या हॉटेल मधील रूम खूपच छोट्या असतात. म्हणजे त्या जपानी लोकांच्या दृष्टीने स्टॅंडर्ड असल्या तरी आपल्यासाठी न्हाणीघरा एवढ्याच असतात.
आमच्या ऑफीस लोकांनी आम्हाला वेलकम पार्टी दिली. आम्ही आधीच सांगितले होते कि आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत त्यामुळे आम्ही एका भारतीय रेस्टोरेंट मध्ये जेवायला गेलो.
[जपान मधील लोकांना शाकाहारी म्हणजे की हेच मुळी माहित नाही, त्यामुळे पूर्ण शाकाहारी दूरच राहिला :)]ते रेस्टोरेंट अर्धे भारतीय अर्धे जपानी आहे, सगळे जेवण नुसते गोड.एकही पदार्थाला झणझणीत चव नाही. पण जपानी लोक सोबत असल्याने त्यांच्या सोयीनुसार जेवण मागवले.जपानी लोक भारतीय जेवण आवडीने खातात. त्यांच्यासाठी ते जेवण तिखटच असते, तरी खूप सारे लोक सुट्टीच्या दिवशी वगैरे येथे येऊन भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात.[जपान मध्ये खूप सारी भारतीय रेस्टोरेंट आहेत. ]
आम्ही ज्या रेस्टोरेंटमध्ये जेवलो तेथील लोक खूपच चांगले होते. सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत होते. आम्ही ऑर्डर देत असताना त्याने जपानी लोकांना आधी सांगून ठेवले कि तुम्ही ऑर्डर केलेले खूप जास्त होईल, नीट विचार करून मागवा, तरीही जे ह्वायचे ते झाले.या लोकांनी निम्म्याहून जास्त जेवण वाया घालवले. :( असो...
ऑफीस मध्ये पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणात खूप गम्मत झाली. आमच्या साठी शाकाहारी जेवण शोधता शोधता धावपळ करावी लागली. शेवटी ऑफीस बाहेर मोबाईल गाडी मधून मिळणार एशिअन करी "ग्रीन करी" [भात आणि आमटी] घेतला, जपानी चिकट भात आणि आल्याची आमटी असा जेवण घेतल्यावर उद्यापासून घरूनच डब्बा न्यायचे मनाशी पक्के केले.
इकडे ब्रेड आणि केक चे असंख्य वेगळे प्रकार पाहायला मिळतात. आणि ते खरेच खूप छान लागतात. यांच्या कडील साखर आपला सारखी गोड नसते. त्यामुळे इकडचे गोड पदार्थ आपल्या सारखे तसे गोड नसतात.
दुकानातून सगळे पदार्थ खूप सुंदर सजवले असतात. अगदी मांस मच्छी न खाणार्याला हि मोह होऊ शकतो घ्यायचा.
इकडचा माणूस नकाशात जगतो असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कुठेही जा हातात नकाशा असणारच [आता आय फोन ]. कोणावरही अवलंबून राहायचे नाही. बाहेरून आलेल्या लोकांना स्वखर्चाने नकाशाची प्रिंट काढून देणार आणि कसे जायचे ते पद्धतशिरपणे आणि अगदी किती वेळ लागेल सगळ सांगणार. बाहेरील माणसाला झालेला त्रास त्यांना पाहवत नाही आणि कोणाला त्रास देववत नाही.
जपान मध्ये शेत जमीन खूप कमी, त्या मुळे शेतीच्या बाबतीत भरपूर संशोधन करून या लोकांनी हायब्रीड पिके बाजारात आणलीत. भले थोरले मुळा, कांदे,बटाटे,सफरचंद पाहून त्यांची कीव करावी कि कौतुक कळत नाही.
..........................................................अस्मित [१९  ऑक्टो २०१२ जपान]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: