माझी जपान सफर - २
सृष्टी मध्ये बहु लोक, परिभ्रमणे काळे कौतुक - समर्थ [पु.ल. च्या पूर्वरंग पुस्तकातून साभार]
इतके वर्ष नुसत विचारातून पाहिलेला, हिंडलेला देश पाहायला मी जाणार होते.
आधी महिनाभर नुसत जाणार कि नाही यावरून हृदयाचे ठोके ऑलिम्पिक मध्ये धावल्या सारखे होते होते, आणि खरेच जायची वेळ आली तेव्हां अतिहर्षाने
आपण विमानाऐवजी स्वत:च उडून जातोय कि काय असे वाटू लागले.
असो..तर एकदाची जाण्याची वेळ, तारीख ठरले. मी(?) प्रवासाला(?) (ते हि एवढ्या लांबच्या :P) निघणार म्हणल्यावर सगळ्यांना सत्रांदा फोनाफोनी करून मी जातेय, बॅग कोणती आणि कितीची घेऊ, काय काय समान घेऊन जाऊ, तिकडे थंडी असेल कि पाऊस, विमानाची वेळ, बॅगेचे वजन इ. इ. सगळे करून झाले.
माझ्या वैद्यांनी पण तीन महिन्यांची औषधे देऊन माझ्या बॅगेचे आणि स्वतःच्या खिशाचे वजन थोडे आणखीन वाढवले.
सरते शेवटी जाण्याची वेळ झाली आणि घरापासून विमानतळा पर्यंत पोहोचवणारी (दोन्ही अर्थाने पोहोचवणारी, कारण चेन्नई मधील सगळे ड्राईव्हर F1 मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत ) कॅब आलीच नाही आणि मी अजूनही भारत देशात असल्याचे तत्काळ ज्ञान त्यांनी मला करून दिले.
मग त्यांच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार करत आम्ही आपल्या ३ चाकीने म्हणजे रिक्षाने निघालो.विमानतळावरील सगळे सोपस्कार आटोपून आमचे श्रीलंकेचे विमान चक्क वेळे आधी उडाले. रावण वधा नंतर भारतीय लोकांचा त्यांनी धसका घेतला असावा बहुतेक. भारताचा राष्ट्रीय पक्षी विमान सुंदरींच्या साडीवर दिमाखाने मिरवत होता आणि चेहऱ्यावर गोड हसू ठेवून "Ayubowan!" ("अयुबोवन" (सिंघाली भाषेत अर्थ "भरपूर वर्ष जागा") अस म्हणत सगळ्यांचे स्वागत करत होत्या. आता विमानाने प्रवास करत असताना "भरपूर वर्ष जागा" अस म्हणून स्वागत करण्यामागचे कारण मला समजले नाही.कदाचिद आपल्या बंधू भावांच्या विमाने उडवण्याच्या खेळाचा त्यांना खूप आदर असावा.असो..
श्रीलंकेत कोलोम्बो ला उतरलो. तेथून टोकियो ला जाणार्या दुसर्या विमानात बसायचे होते. श्रीलंकेचा विमानतळ खूपच सुंदर आहे. तिथे गौतम बुद्धाची मोठी आणि छान मूर्ती आहे. १ तासाने टोकियो च्या विमानात बसलो. माझ्या शेजारी ३ जपानी स्त्रिया होत्या, त्यातील दोघीजणी विमान सुरु होण्याआधीच कुठे गेल्या त्या परत आल्याच नाहीत. रात्रीचे ११:३० झाले होते, मग मी आणि ती उरलेली जपानी बाई चक्क शेजारील सीट वर पाय पसरून भारतीय रेल्वेत असल्यासारखं आडवे होऊन झोपून गेलो ते थेट सकाळीच उठलो. कुठेहि जा मला आपण भारतीय असल्याचा पूर्ण अभिमान आहे.
..................................अस्मित [१७ ऑक्टो २०१२ जपान]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा