मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

माझी जपान सफर -८







या शनिवारी आम्ही फक्त दोघी मैत्रिणीच फिरायला गेलो.आदल्या दिवशीच सगळी माहिती गोळा करून कसे, कुठे,किती वाजता जायचे हे ठरवले.
जपानला आल्यापासून दर शनिवारी अथवा रविवारी नुसते भटकत होतो, त्यामुळे या वेळेस आरामात भटकंती करायची. स्वतःला अजिबात त्रास न करून घेता आणि घाई गडबडीने कुठेही जायचे नाही हे ठरवले होते.
या वेळची सफर साऱ्या जगाला "अजस्त्र बुद्धमूर्ती"चे  शहर म्हणून ओळख असलेल्या "कामाकुरा" ला होती.
पसरट टुमदार छोटी छोटी घरं, घरांच्या आजूबाजूला विविध प्रकारची आणि व्यवस्थित राखलेली झाडे असलेलं "कामाकुरा" हे एक छोटस पण आकर्षक शहर. जपानच्या होन्शू प्रांतातील कानागावा जिल्ह्यात वसलेले कामाकुरा, टोकियो जवळच्या काही प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक. टोकियो पासून अंदाजे दक्षिणेकडे ५० कि.मी.  अंतरावर असणार्‍या कामाकुराचे मुख्य आकर्षण म्हणजे कोतोकू-इन नावाची भव्य बुद्धमुर्ती. जपानच्या प्रसिद्ध सांस्कृतिक शहरात कामाकुराची गणना असून येथे केंचोजी, एन्याकुजी इ. देवतांची सु. शंभर देवालये आहेत.सुगीमोतोदेरा  नावाचे शिंतो देवालय सुमारे १२०० वर्ष जुने आहे.याच ठिकाणी प्रसिध्द ५ भव्य झेन देवालये [कामाकुरा गोझान]आहेत.
मिनामोतोनो योरिमोतो नावाच्या एका सामुराई सेनापतीने जपान मध्ये सामुराई सरकार बनविण्याचा निर्णय घेतला आणि त्या सरकारचे मुख्य ठिकाण "कामाकुरा" निवडण्यात आले (३ हि बाजूला उंच डोंगर आणि एका दुसर्‍या बाजूला सागामी उपसागर असल्या कारणाने सुरक्षित म्हणून सन ११८०).या सामुराई सेनापतीने स्वतंत्र अशी "बाकुफू /शोगुनआते" नावाची राजकीय प्रणाली स्थापन केली.सुमारे ७०० वर्षांनतर हि सत्ता मेईजी काळात राजाकडे सोपविण्यात आली.
या शहराची  लोकसंख्या सुमारे १७४,४१२ आहे. उत्तरेकडून पूर्वेकडे रोक्कोकुकेन(六国見147 m/482 ft), ओहिरा (大平山159 m/522 ft), जुबू (鷲峰山 127 m/417 ft), तेन्दाई (天台山141 m/463 ft), किनुबरी (衣張山 120 m/390 ft) अशा अनेक डोंगर दर्यांनी कामाकुरा वेढले गेले आहे.
आम्हाला आत्सुगी पासून कामाकुरा ला येण्यासाठी ४ ट्रेन बदलाव्या लागल्या. तिथे आम्ही साधारण दुपारी १:३० ला पोहोचलो. आधी काम केले ते पोटोबांना शांत करण्यासाठी म्हणून आम्ही "Mc D" मध्ये गेलो .मग चालत भटकण्याचे ठरवले.
सुरुवातीला कोतोकू-इन [बुद्ध मंदिर]ला गेलो.आत जायला २००येन आणि बुद्धमूर्ती आतून पाहायला २० येन चे तिकीट काढावे लागते. जपानी भाषेत इथल्या बुद्ध मुर्तीला 'दाइबुत्सु' (大仏 , daibutsu) म्हणतात. दाइ (大) म्हणजे मोठा / महान आणि बुत्सु (仏) म्हणजे बुद्ध. एकूणच 'महान बुद्ध'. या मुर्तीकडे पाहून लक्षात येतेच. सामुराई सेनापती मिनामोतोनो योरिमोटो ची इच्छा म्हणून हि मूर्ती बनविण्यात आली. कोर्ट लेडी  इनादा आणि  धर्मगुरु जोको यांनी या साठी पैसे गोळा करणे, जागा शोधणे असे परिश्रम घेतले. धर्मगुरूंच्या मते पवित्र भूमीचा /त्रीलोकाचा देवता पश्चिमेकडे वसतो आणि त्यांच्या मान्यते नुसार पश्चिम कामाकुरा मध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १२४३ मध्ये हा पुतळा पहिल्यांदा बनविण्यात आला. सुरुवातीला लाकडी मूर्ती, तेही २४ मी. उंच अशी होती. परंतु १२४७ च्या वादळात हि मूर्ती पूर्ण कोलमडून पडली. त्यानंतर ५ वर्षांनी म्हणजे  १२५२ मध्ये १३.३५ मीटर उंच आणि १२१ टन वजन असलेली ब्राँझची मूर्ती बनवायला प्रारंभ झाला.हि मूर्ती १२६२ मध्ये पूर्ण बनवून झाली.त्या मूर्ती भोवती ४० मी उंच लाकडी देऊळ होते. परंतु तेही १२३५ च्या वादळाने उद्वस्त झाले.त्यानंतर १४९८ च्या भूकंप आणि त्सुनामी वादळाने नवीन बांधलेली इमारत कोसळून गेली, परंतु मूर्ती ला काहीही झाले नाही, हे आश्चर्य...त्यानंतर देऊळ बांधायला कोणीही मदत केली नाही आणि तेव्हा पासून हि मूर्ती अशीच वादळवाऱ्यात उघड्यावर आहे गेली ७०० वर्ष....
या मुतीच्या मागे ४ कमळाच्या पाकळ्या आहेत, त्यावर देणगीदारांची नावे कोरलेली आहेत.बुद्धाच्या पाठीवर २ खिडक्या आहेत. मूर्तीसमोर उदबत्ती लावायला मोठ्ठ उदबत्ती घर आहे. काही लोक इथे मोठ्या भक्ती भावाने पूजा करताना, हात जोडताना दिसतात. परंतु बरेचसे लोक हे देऊळ नसून टूरिस्ट प्लेस असल्यासारखे वागतात. बुद्धाच्या मूर्तीसमोर कसेही फोटो काढताना दिसतात.एक देव म्हणून मूर्तीकडे पाहणारे लोक कमीच आढळतात.
जपानी लोक पण बरेचसे [अंध] श्रद्धाळू आहेत. येथील दुकानातून लकी बेल, लकी स्टोन असे बरेच काही विकायला असलेले दिसते.ते आपल्या जवळ ठेवल्याने निरोगी आरोग्य, पैसा, शांती मिळते असे मानतात. येथे एक मातीची घंटी पाहायला मिळाली. ती घंटी सतत जवळ बाळगल्याने आपल्यावर येणारे संकट त्या घंटीवर जाते आणि त्यामुळे ती घंटी फुटते असे मानतात.परंतु घंटी कुठेतरी आपटून फुटली का संकटाने फोडली? कसे कळणार???? [हा माझा बाळबोध प्रश्न. कारण जर का ती घंटी घेऊन मी भारतात आले असते आणि मध्ये प्रवासात फुटली असती तर????? माझ्या प्रवासात संकट होते असे मी मानायचे?????]
मूर्तीच्या आत जायला खूपच छोटा जिना आहे. आणि तेथे थोडा काळोख पण होता. आत गेल्यावर हात लावले कि मूर्ती किती जाड आणि जड आहे ते जाणवते. आतील भागात मूर्तीच्या आर्किटेक्चर बद्दल माहिती दिलेली आहे. जॉइंट्स कुठे कसे आहेत ते नीट ड्रॉ करून दाखवले आहे. तेथे आर्किटेक्चर शिकणारे विद्यार्थी पण मूर्तीचा अभ्यास करायला आले होते.
बाहेर पडल्यावर पुढे आम्ही "कैकोझान जीशो-इन हासे-डेरा" हे बुद्ध मंदिर पाहायला गेलो.हे मंदिर तोकुदो नावाच्या धर्मगुरूने सुमारे ७२१ ए.डी. च्या काळात बांधले आहे.एकदा जंगलात या धर्मगुरूला कापराचे मोठ्ठे झाड दिसले आणि ते पाहून  "झाडाचे खोड एवढे मोठे आहे कि ११ डोकी असलेले २ पुतळे यातून बनविता येतील" असा विचार त्याला आला.या झाडापासून बनविलेला १ पुतळा नारा मधील देवळात आहे आणि २रा पुतळा जो दोन्ही मध्ये मोठा होता, तो समुद्रात टाकून दिला आणि प्रार्थना केली कि हा पुतळा जेथे जाईल तेथे तो लोकांचे रक्षण करो. १५ वर्षांनी हा पुतळा १८ जून ७३६ मध्ये "नागाई" समुद्र किनारी दिसून आला. तो पुतळा कामाकुरा ला आणून मग त्याचे देऊळ बांधण्यात आले.
या देवळाचा  परिसर ४०,०००  स्क़्वे.मी. असा आहे.कर्नाटकातील "कोटी लिंगेश्वरा" येथे जशी खूप सारी शिवलिंग आहेत तसे येथे मंदिराच्या भोवताली खूप सार्‍या मूर्ती ठेवलेल्या आहेत (त्यांचे खरे कारण नंतर समजले). काही मूर्तीवर वाहत्या पाण्याने अभिषेक केला जातो. त्यासाठी  जवळच एक ओरगले ठेवलेले असते. त्या ओर्गाल्याने पाणी मूर्तीच्या डोक्यावर, दोन्ही खांद्यांवर टाकले जाते.येथे उदबत्ती,मेणबत्ती आणि फुलांचे गुच्छ विकायला ठेवलेले असतात. आपले आपण ते पैसे देऊन घ्यायचे. कोणी विक्रेता नाही,आरडा ओरड नाही कि फसवणूक नाही.
देवळाजवळ एक खूप मोठी घंटा आहे[१६७.६ से.मी उंच आणि १२६४ मध्ये तयार केली.] ती वाजवण्यासाठी एक लाकडी ओंडका लटकावलेला असतो. आपल्यासारख घंटेला आतून ओंडका नसून, तो बाहेरून घंटेवर मारायचा असतो. या मंदिरातील बुद्ध मूर्ती अतिशय सुंदर,रेखीव  आहे. ११ डोकी (संस्कृत मध्ये एकादशमुख) असलेला "कान्झेओन" देव पाहून डोळ्याचे पारणे फिटते.९.१८ मी उंच कापराच्या लाकडाची मूर्ती आणि तिला सोनेरी रंग देण्यात आला आहे. पाहून असे वाटते कि मूर्ती धातूची असावी. ४ मुख्य डोकी आणि बाकी डोकी या ४ डोक्यांच्या वर आहेत.सर्वात मागचा चेहरा हसतानाचा आहे असे मानतात [आणि बुद्ध हसला....]
पुढे कानोन देवीच्या ३३ वेगवेगळे भाव असलेल्या मूर्ती आहेत. असे मानले जाते कि हि देवी ३३ वेगळ्या भावात स्वतःला प्रकट करू शकते आणि ती दुखी कष्टी लोकांचे रक्षण करते.या मूर्ती जवळपास १ मी उंचीच्या आहेत. सर्वात जुनी मूर्ती १५४३ मधील आहे.
येथे एक "क्योझो / सूत्र भांडार" आहे. बुद्धाची सूत्रे अगदी महायाना सहित सगळी, येथे एका फिरत्या कपाटा मध्ये जतन करून ठेवली आहेत.महायान बुद्धिझम ("इस्साइक्यो") चे १०० भाग आहेत आणि प्रत्येक भाग ९०० पानांचा आहे.सर्व माहिती चायनीज भाषेत आहे. (या पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले आहे, त्यासाठी १७ वर्षे लागली). जर तुम्ही ते पुस्तकांचे कपाट एकदा फिरवले तर तुम्हाला ती सगळी पुस्तके वाचण्याचे पुण्य मिळते असते मानतात (शोर्ट कट... :) )
या मंदिराच्या आजूबाजूला काही पुतळे आपल्याकडील देवीसारखे वेगवेगळ्या रुपात दिसतात. कोणी पायाखाली असुर मारतंय, कोणी तलवार उपसली आहे असे.
मंदिराच्या मागे डोंगरावर जायला जिना आहे. तेथून मंदिराचा रम्य परिसर आणि दूरवरचा समुद्र किनारा दिसतो.
मंदिराच्या उत्तरेकडे गुहेत  दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. आपण साधारण २ इंच उंचीच्या मूर्ती आप्तेष्टांच्या नावाने येथे अर्पण शकतो. या मूर्तीची किंमत साधारण ५०० येन आहे.
येथे जवळच "एननोजी" नावाचे मंदिर आहे. या मंदिरात इंग्रजी "U" आकारात वेगवेगळ्या देवाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. असे मानले जाते कि माणूस मेल्यावर स्वर्गात जाणार कि नरकात हे ठरवण्यासाठी या १० मुर्तींसमोर (१० राजे) जावे लागते. त्या मूर्ती त्या माणसाचे सगळे आयुष्य तपासून मग निर्णय घेतात.
जपानमध्ये "मिझुको" चा धंदा खूप जोरात चालतो. १९९९ पर्यंत येथे गर्भनिरोधक गोळ्यांना मान्यता नव्हती, त्यामुळे नको असलेले गर्भ पाडून त्यांच्या नावाने येथे "जीझो" ची मूर्ती वाहिली जायची.काही देवळे यामधून खूप पैसे कमावतात.
मंदिर पाहून आम्ही  पुढे समुद्र किनारी गेलो , परंतु खूप जोराचा वारा आणि थंडी मुळे  आम्हाला लगेच माघारी परतीचा प्रवास स्वीकारला.
.............................................अस्मित [३१ ऑक्टो २०१२ जपान]

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२




माझी जपान सफर - ७

एका शनिवारी आम्ही ऑफिस मधील मराठी लोकांनी एनोशिमा नावाच्या टापूवर जायचे ठरवले.
सकाळी १० ला निघायचे होते. आम्ही मुली बरोबर १० ला तयार होऊन बसलो तर, मुलांनी अर्धा तास उशीर लावला निघायला [कोण म्हणाल रेमुली वेळ लावतात आवरायला.....?]
आता सुरुवातच अशी झाली म्हंटल्यावर पुढे की होणार.......[खरेतर काही झाले नाही...आमचा प्रवास सुखाचा झाला :)]
आम्ही सगळ्यांसाठी खायला म्हणून सफरचंद,बिस्किट्स वगैरे गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या, त्यामुळे बॅग खूपच जड झाली होती.
२ ट्रेन बदलत आम्ही एकदाचे तिथे पोहोचलो. एनोशिमा हा एक ४ किलो.मि. परिसरात "कातासे" नावाच्या नदीवर पसरलेला टापू आहे. आम्ही पोहोचलो त्यावेळी तेथे बोटीची शर्यत चालू होती. दुसरीकडे लोक पाण्यात चालणारी मोटोरबाईक घेऊन एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत,एकमेकांना पाण्यात पाडत [पाण्यात पाहत नव्हे] मस्त खेळत होते. एक जपानी मुलगी ती पाण्यातील बाईक चालवायचा खूप प्रयत्न करत होती. परंतु ती सारखी पाण्यात पाडत होती. या बाईक चालवणे तसे खूप अवघड वाटत होते. कारण पाण्याला खूप प्रवाह होता आणि त्या बाईकच्या पायाला नीट आधार नव्हता, त्यामुळे लोक पाण्यात पडत होते.
हे सर्व पाहत असताना अचानक लक्ष समोरच्या डोंगर रांगांकडे गेले आणि ज्याची इतके वर्ष नुसती कौतुके ऐकली होती तो; जपानी लोकांचा देवासमान पुजला गेलेला "फुजी" पर्वत दिसला.मी श्वास रोखून नुसते त्या पर्वताकडे पहात राहिले. डोंगराच्या माथ्यावर थोडे बर्फ साचून तो पांढरा शुभ्र होऊन उन्हाने मस्त चमकत होता.कितीही फोटो काढले तरी प्रत्यक्षात तो अनुभव घेणे खरेच थक्क करून सोडणारे आहे.[मला ऑफिसला जाताना रोज फुजी पर्वत दिसतो आणि मी रोज त्याच उत्साहाने त्याला पाहते. रोज नित्य नवा होऊन भेटतो तो आपल्याला.]
पुढे गेल्यावर वर जाताना एका छोट्या बाजार पेठेतून जावे लागते.येथे खूप सारी सागरी वस्तूंची दुकाने, छोटे हॉटेल्स पाहायला मिळतात [अहो, म्हणजे तुम्ही खाऊ पण शकता तिथे...आपल कामच ते]
येथे खूप सारे समुद्रातील प्राणी तव्यावर दिसले. शिंपले, ऑक्टोपस, माशांची पिल्ले, माशांची अंडी,कासवे सगळे काही होते.
इथे कासवाची कवचे, शंख-शिंपले, माशांची कवचे असे खूप काही दुकानातून विकायला होते. एकेठिकाणी ऑक्टोपसला खूप प्रेशर देऊन त्याचा पापड बनवून विकत होते. तसच कोलंबी चे पापड पण.
या टापूवर ३ देवी "भूमाता, सागरी दळणवळण आणि मच्छी"अशांना पूजले जाते. बेनझाईतेन [裸弁財天]" नावाची खूप प्रसिध्द [संगीत आणि मनोरंजनाची] देवी पुजली जाते. तिची मूर्ती चीनची आहे असे मानतात आणि ती मूर्ती पूर्ण नग्न बसलेल्या अवस्थेत एक जपानी वाद्य वाजवताना आहे. येथे "पवित्र पाणी" म्हणून एक छोटे दगडी टाके असते,त्यातील पाणी आपल्याकडील देवटाक्या प्रमाणे थंड असते. देवळात जाण्याआधी सगळेजण त्या पाण्याने हात धुवून मग देवळात जातात.कोणत्याही शिंतो देवळात जाण्यासाठी या पाण्याने स्वतःला पवित्र करून मगच देवळात प्रवेश करायचा असतो. हात धुण्याची पद्दत पण ठरलेली आहे. आधी उजव्या हातात ओरगले पकडून डावा हात धुवायचा मग उजवा हात धुवायचा. त्यानंतर तोंडात थोडे पाणी घेऊन ते पाणी थुंकून टाकायचे. पुढे देवळात प्रवेश करून तेथील घंटा वाजवायची. हे घंटा वाजवणे प्रकरण पण अवघड वाटते [मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे...] कारण ती घंटा खूप वर बांधलेली असते आणि त्याची दोरी ओढताना खूप कष्ट घ्यावे लागतात. बरेचदा नुसती दोरी हलते, घंटा वाजत नाही [मला वाजवता आली.... म्हणजे मी पवित्र मनाने गेले होते यात शंकाच नाही :)] लोक देवळात चप्पल घालूनच प्रवेश करतात. उदबत्ती लावतात आणि हातावर हात मारून आवाज करत मग नमस्कार करतात.येथे लोक आपल्या प्रियजनांच्या नावाने एक इच्छा मनात धरून कागदाची चिट्ठी देवळाबाहेर बांधतात.एका देवळात छतावर कासवाचे चित्र काढलेले आहे. ते चित्र होईत्सू साकी नावाच्या व्यक्तीने काढलेले आहे. ते कासव ८ दिशांमध्ये कुठूनही पहा, आपल्याकडेच पाहतंय असे वाटते.
ज्यांना टापू चढून जायचा नाही त्यांच्यासाठी सरकता जिना उपलब्ध आहे. या टापूवर पाहण्यासाठी बॉटनिकल गार्डन, लाईट हाउस,संग्रहालय असे बरेच काही आहे.येथे येणारी लोकांचे मनोरंजन करायला अनेक हौशी कलाकार आपली कला सादर करताना आढळतात.
पुढे एके ठिकाणी पहिल्या १०० लोकांना जपानी नुडल्स फक्त १०० येन मध्ये विकत होते.आम्ही ते जपानी जेवण अर्थातच खाल्ले नाही. कारण यांच्या रस्त्यावर गटाराचे,कचर्याचे घन वास येत नसतील एक वेळ, पण जेवणाचा वास भयंकर असतो.
लाईट हाउसवर गेल्यावर समुद्राचे खूप विहंगम दृश दिसते.हा टॉवर ६० मी.उंच आहे.
लहान मुलांसाठी येथे लांब फुग्याची [आपल्याकडे ते काकडी फुगे असतात तसे....] वेगवेगळी खेळणी बनवून देत होते. एकाकडे फुग्याची टोपी, तर दुसरा फुग्या पासून बनवलेली पॅंट आणि त्याला तलवार लाऊन हिंडत होता. एकंदर सगळे खुश होते आणि आनंद लुटत होते.काही लोक सर्फिंग, बोटिंग करताना आढळतात. काही लोक आकाशात पॅराग्लाइडिंग करताना आढळले.
फिरायला आलेले अनेक लोक आपली कुत्री घेऊन आले होते. त्यांना [म्हणजे कुत्र्यांना] कडेवर घेऊन मस्त हिंडत होते.एकही कुत्रा भुंकून त्रास देत नव्हता कोणाला. येथील मांजरी खूपच गब्दुल होत्या. आणि त्या पण तशाच शांत. कमाल वाटते या प्राण्यांची....जिवंतपणाची लक्षणे अजिबात जाणवत नाहीत यांच्यात.
या टापूवर ६००० वर्षांपासून सुमुद्राच्या भारती ओहोटीमुळे तयार झालेल्या गुहा आहेत.त्यांना "एनोशिमा इवाया केव्स" असे म्हणतात.या गुहांमध्ये दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. मला तिथे आपल्याकडील त्रिमूर्ती सारखी एक मूर्ती दिसली.एका बाजूला कुकाइ प्रिस्ट, दुसरीकडे कोंगो [वज्रधातू], ताईझो [गर्भकोश. या गुहेबद्दल येथील लोक असे म्हणतात कि ; या गुहेच आकार स्त्रीच्या योनीच्या आकारा प्रमाणे आहे.] अश्या गुहा आहेत.दुसर्याबाजूला तोंडाने आग ओकणारा ड्रॅगन, ऐतिहासिक चित्रे आहेत.या गुहांमधून पाणी टपकत असले तरी जपानी लोकांनी प्लास्टिकच्या पट्ट्या लाऊन ते व्यवस्थित अडवल्यामुळे आपल्या अंगावर पाणी, बारीक माती पडत नाही.गुह्नाची उंची कमी असल्यामुळे वाकूनच चालावे लागते. डोक्याला दगड लागू नयेत म्हणून स्पंज आणि रबरचे जाड पडदे बसवल्याने आपण सुरक्षित असतो.
गुहांमधून ऐरवी येतो तसा कुबट घाण वास अजिबात येत नाही.
येथे एक "लव बेल" नावाची जागा होती. ती बेल वाजवून आपल्या प्रेमासाठी प्रार्थना करायची म्हणे....
परत फिरताना आम्ही तेथील बाजारपेठेत खरेदी केली आणि सागर किनारी येऊन बसलो.
पाणी खूपच थंड होते आणि वार्यामुळे आणखीनच थंडी वाजत होती.
किनाऱ्यावरची रेती काळ्या रंगाची होती. शिंपले आणि शंखांचे थोडे वेगळे प्रकार येथे पाहायला मिळाले.
सांगायची गोष्ट म्हणजे येथे खूप प्रमाणात घारी होत्या. आमच्या एका मित्राने त्यांचे खूप सुंदर आणि खूप जास्त [जवळ जवळ १५० फोटो] काढलेत.
अश्या प्रकारे आमची हि ट्रीपछान झाली. परंतु उशीर झाल्याने आम्हाला डॉल्फिन्स चा शो पाहता नाही आला.
तो आता पुढच्या ट्रीपला...........
.............................................अस्मित [२९ ऑक्टो २०१२ जपान]

शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१२



माझी जपान सफर - ६

माझे लेख वाचून काही जणांनी मला जपानी माणूस आणि त्यांच्या समाजाबद्दल विचारले...त्यांचा आणि तुमचा मान ठेऊन हा पुढील लेख.

खरेतर मला इथे येऊन फार दिवस झाले नाहीत. जपानी माणूस, त्यांचा समाज मलाच अजून पुरता समजलेला नाही.त्यामुळे आतापर्यंत तो जेवढा

पहिला, ऐकला तेवढाच तुमच्या समोर मांडत आहे.
खरेतर जपानी माणूस म्हंटले कि आपल्या समोर बुटका,गोल चेहर्याचा, चपटे नाक,सरळ केस,मिचमिचे डोळे अशी व्यक्ती समोर उभी राहते, नाहीतर एखादी बाहुली सारखी वाटणारी छान गोंडस
मुलगी.संकोची,विनम्र आणि परिपूर्णतेचा ध्यास असणारा......
परंतु या पलीकडचा जपानी माणूस नक्की आहे तरी कसा..???
खरेतर जपान मध्ये पण सगळ्या प्रकारच्या अंगकाठी असणारे लोक दिसतात; उंच, बारीक,जाड, बुटके [सुमो पैलवान तर आपल्याला माहीतच आहेत.].
परंतु अजूनतरी येथे प्रतिष्ठा दाखवणारे [कि घालवणारे] पोट सुटलेले जपानी लोक पहिले नाहीत [सुमो सोडून].
येथील लोकांची पेहरावाची पद्धत सामान्यत: अशी आहे : येथील पुरुष कधी गडद रंगाचे, खूप डिज़ाइन असलेले कपडे फार कमी वेळा घालताना दिसतो.ऑफिसमध्ये तर सगळे सारखेच ड्रेस घालून आल्यासारखे वाटतात; कोट,व्हाईट शर्ट,टाय वगैरे. यांचा व्हाईट शर्ट म्हणजे खरेच एकदम प्युअर व्हाईट असतो.कधी सेंट,परफ्युम चा घमघमाट येथे जाणवत नाही. मुलांना आवडते ते केसांची विचित्र स्टाइल करणे आणि केस रंगवणे.तरुण पिढी जीन्स कमरेच्या एवढ्या खाली घालते कि त्यांची पॅंट खाली पडते कि काय याचे टेन्षन त्याच्या पेक्षा आपल्यालाच जास्त येते.
परंतु मुलींच्या फॅशनची कथाच निराळी आहे. येथील मुलींचे कपडे खूपच तोकडे असतात. स्कर्ट, शॉर्ट पॅंट,फ्रॉक्स घालून त्यावर पायभर मोजे चढवणे. कपडे एवढे लहान की लहानपणीचे कपडे अजूनही वापरात असावेत असे वाटते.आणि त्यावर आणखीन कहर म्हणजे ३-४ इंच उंच टाचा असणारे बूट घालणे हि या मुलींची फॅशन आहे.चालताना पाय वेडेवाकडे झाले, गुडघे वाकले तरी चालतात पण उंच टाचा हव्यातच. फॅशनचा आणखीन
प्रकार म्हणजे डोळ्यांना खोट्या पापण्या लावणे,डोळे रंगवणे,कलर लेन्स लावणे, नखे रंगवणे [त्यांच्याकडे खोट्या पापण्या आणि नखे लावण्यासाठी खूप सारी दुकाने आहेत. आपल्याकडे गल्ली बोळात पार्लर्स असतात तशीच अगदी.] हे सगळे त्यांना शोभून दिसते असे नाही पण तरी ते करणारच.या सगळ्यात न बदलणारी गोष्ट म्हणजे त्यांचे केस ठेवण्याची पद्धत. बर्याच मुली त्यांचे ते सरळसोट केस मोकळे सोडून असतात.ते कलर केलेले असू शकतात पण मोकळेच. कधी नीट विंचरून,बांधून ठेवलेत असे कमी आढळते. काही मुली डोळ्यावर येणारे केस तसेच ठेऊन कश्या राहू शकतात याचे आश्चर्य वाटत राहते.त्याचे ते अवतार पाहून मला देवाने भारतात का जन्माला घातले या मागचे खरे रहस्य समजले.परंतु कुठेहि विकएंड म्हणून दारू पिऊन लोळणारी पिढी दिसली नाही अजूनतरी.
जपानी समाजात धर्म हा मुख्यत्वेकरून सामाजिक चालीरीतींवरच आधारलेला आहे, अध्यात्मावर नव्हे. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती शिंतो-मंदिर व बुद्धमंदिर अशा दोन्हीही देवळांत दर्शनार्थ जाते. शिंतो आणि बौद्ध हे दोन धर्म जपानमध्ये प्रभावी आहेत. मात्र जपानी लोकांचे धर्मविचार सांस्कृतिक वा तत्त्वज्ञानात्मक विचारसरणीवर आधारलेले नाहीत. लोक केवळ मनावरील पूर्वापार संस्कारांमुळेच शिंतो देवळात जाऊन चांगले पीक यावे, मासे पकडण्याचा धंदा अगर इतर कामे चांगली व्हावीत, कुटुंबात किंवा शेजाऱ्यापाजाऱ्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात, म्हणून प्रार्थना करतात. त्याच कारणाने जपानी लोक अंत्यविधीसाठी वा मृतांच्या आत्म्यासाठी करावयाचे संस्कार बुद्ध मंदिरात जाऊन करतात. दोन वेगळ्या गोष्टींसाठी दोन वेगळ्या धर्मांचा उपयोग करण्यात जपानी लोकांना काहीच वावगे वाटत नाही. याउलट परदेशी जाऊन राहणारी भारतीय माणसेच आपापले गट आणि प्रदेश-भाषा - जातीजमातीनुसार उपगट करून एका सीमीत वर्तुळात राहतात.
जपानी माणूस खूप शांत आहे.कधी चिडलेला.आरडओरड करणारा जपानी माणूस दिसणे अशक्य वाटते.जपानी पुरूषांपेक्षा बायका अधिक मोकळ्या, देवाणघेवाण-संवाद सहज करू शकणार्या अशा वाटतात.बस, ट्रेन, कुठेही जा हा प्राणी नेहमी मोबाईल नाहीतर पुस्तक वाचताना आढळतो. अगदी सागर किनारी बसलेल जोडपे सुद्धा एकमेकांशी न बोलता मोबाईल वर बिझी दिसते.कुठेहि गेले तरी रांगेत उभे राहून शांतपणे आपल्या गोष्टीत बिझी राहणारा हा माणूस घरी संवाद कसा साधतो हे एक कोडे आहे.पूर्ण परिवारासहित फिरणारा असा माणूस दिसणे विरळा.
हे लोक प्राण्यांवर खूप प्रेम करतात.इथे कधी रस्त्यावर कुत्री, मांजरे,डुक्कर,गाई असे आढळत नाही[आपल्याकडे गाई रस्त्यावर आणि यांच्याकडे त्या ताटात आढळतात असे माझ्या मित्राचे म्हणणे मला पटले.]. मॉल मधून मांजर,कुत्री विकायला ठेवलेली असतात. त्यांची किंमत १ लाख पासून पुढे कितीही असू शकते. प्राणी फिरायला नेताना हे लोक लहान मुलांना असते तशी बाबागाडी अथवा जाळीची हॅंडबॅग वापरतात.प्राण्यांना कपडे, केसांची स्टाइल सगळे व्यवस्थित केले असते. कुठेही खांब ओले दिसत नाहीत ते यामुळेच.....
जपानी घरे मुख्यतः लाकडाचीच बांधलेली असतात.कुठल्याही जपानी घरात बाहेरचे बूट घालून प्रवेश करायचा नसतो.घराच्या आतील दालनांचे विभाजन लाकडाच्या चौकटीवर कागद चिकटवलेल्या सरकत्या पडद्यांनी केलेले असते. यामुळे खोल्या जरूरीप्रमाणे लहानमोठ्या करता येतात. घरात सर्वत्र एक ते दीड इंच जाडीच्या गवताच्या चटया पसरलेल्या असतात. त्या चटयांना तातामी म्हणतात. बैठकीसाठी मोठ्या उशांचा वापर करण्यात येतो.घरातील सगळ्या जागेचा व्यवस्थित उपयोग करून घेतलेला आढळतो.खरच कौतुक वाटते यांच्या कलाकारीचे.जपानी माणूस घरातून बाहेर पडताना नेहमी बातम्यांमधून हवामानाचा अंदाज घेऊनच निघतो. इथले हवामान खाते पण बरेचदा अचूक माहिती देते.त्यामुळे सहसा अचानक पाऊस वगैरे असा त्रास होत नाही.इथल्या बातम्यांमधून चोरी,दरोडा,बलात्कार,खून असे प्रकार कमी पाहायला मिळतात.वर्तमानपत्र सुद्धा वाचताना या गोष्टी कमीच नजरेत येतात.
येथील कचरा विभाजन पद्धत पण खूप काटेकोर पाळली जाते.ओला,सुका कचरा, जाळता येणारा - न जाळता येणारा कचरा, प्लास्टिक, स्टील.लोखंड,काच असे सगळे कचर्याचे वेगवेगळे प्रकार करून तो ठरवून दिलेल्या दिवशीच टाकला जातो.कुठेही रस्त्यात घाण, चिखल दिसून येत नाही कि तुंबलेल्या गटाराचे वास नाहीत.
या लोकांकडून शिकण्यासारखी आणखीन एक गोष्ट म्हणजे यांचे "आदरातिथ्य". कोणत्याही दुकानात जा, बस मध्ये चढा जपानी माणूस "いらっしゃいませ (irasshaimase)" [वेलकम] अस म्हणतोच.बसमध्ये बस सुरु होताना, थांबताना, कुठेही वळताना, कोणता थांबा आला आहे हे सगळे सांगितले जाते. अगदी बस कुठून कुठे जात आहे आणि चढावर जाताना ब्रेक मुळे प्रवासी लोकांना धक्का बसू शकतो,उभे राहिलेल्या लोकांनी नीट काळजी घ्या अशी सगळी माहिती देण्यात येते. काही माहिती ऑटो प्ले पण असते.दिवसभर वेलकम,सॉरी बोलून यांचे तोंड कसे दुखत नाही किंवा कंटाळा, त्रास कसा वाटत नाही.....
आपली कामे सोडून दुसर्यांना मदत करणारी हि माणसे निराळीच.कोणावरही अवलंबून राहणे नाही कि कोणाला कसला त्रास देणे नाही.एखाद्याला सर्दी,खोकला झाला असेल तर लगेच तोंडावर मास्क लावून बाहेर पडणार.
व्यक्तीपेक्षा कुटुंब, समूह, समाज, देश अधिक महत्त्वाचा असे त्यांनी मानले आहे.एकत्र राहायचे तर स्वतःपलिकडे इतरांचाच केला पाहिजे असे सूत्र या समाजजीवनात आढळून येते.यांचे नियम भरले आयुष्य पाहून समजत नाही कि यांचे जीवन सुखवस्तू आहे कि जखडून ठेवलेलं...????
जपानी जेवण दिसायला जेवढे आकर्षक असते तेवढे खाताना असेलच असे नाही. चिकन, मटन, मासे आणि समुद्रातील बरेच प्राणी आणि शैवाल, शेवई किंवा भातासोबत खाणे,त्यात कोणताही मसाला नाही कि तेल गळणे प्रकार नाही. आपल्यासाठी ते बरेचदा खूप बेचव असते.यांच्या जेवणाचे वास पण खूप भयंकर असतात, एवढे कि आपले जेवण पोटातून बाहेर येऊ शकते :D.
जेवण काड्यांनी खाण्याची पद्धत आपल्यासाठी खूप कसरतीची असते. यांचे मटार दाणे नुसत्या काड्यांनी खाण्याचा प्रकार झक्कास....पाणी पिणे कमी, पण हा माणूस दिवसभर त्यांचा हिरवा चहा पीत राहतो.सगळीकडे, अगदी कोपर्यावरच्या गल्लीत पण येथे व्हेंडिंग मशीन्स ठेवलेली असतात.त्यामुळे रात्री १२ ला पण येथे गरम कॉफी मिळू शकते.त्यांच्या कडील मिळणारे ऑक्टोपस आणि कोलंबीचे मासे तर एकदम मस्तच [दिसायला..खायला कसे असतात माहित नाही. मी स्वतःवर प्रयोग केले नाही :)]
आपले भारतीय पदार्थ मात्र हे लोक खूप आवडीने खातात. शुक्रवारी आणि सुटीच्या दिवशी बरेच जपानी लोक भारतीय रेस्टोरेंट मधून रस्सा भाजी आणि चपातीचे तुकडे मोडताना दिसतात. चपाती एका हाताने खाण्याची पद्धत त्यांना जमत नाही त्यामुळे एका हात चपातीचा रोल आणि दुसर्या हाताने चमच्यात भाजी घेऊन खातात.खाताना "तिखट! तिखट!" म्हणून ओरडतील तरी पण ते भारतीय जेवण जेवतातच.यांच्याकडील साखर आपल्याकडे असते तशी गोड नसते. यांचे गोड पदार्थ, केक, बिस्कीट सुद्धा खूप कमी गोड असतात[माझ्यासाठी खूप चांगले आहे ते, मला गोड राहायला आवडते खायला नाही :) ]
भारतीयांवर यांचे प्रेम दिसून येते आणि त्या प्रेमापोटी बरेच जपानी भारतीयांशी लग्न करतात.यांची सध्याची पिढी इंग्रजाळलेली दिसते. ती चांगली कि वाईट हे सांगण्याचा अथवा त्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. पण हि पिढीसुद्धा तेवढीच अगत्यशील आहे एवढे नक्की.
.................................अस्मित [२६ ऑक्टो २०१२ जपान]





माझी जपान सफर - ५

जपान मध्ये आल्यानंतर लगेचचा प्रोग्रॅम म्हणजे टोकियो शहर पाहणे. सर्वात महागडे, उंच उंच इमारती आणि फॅशनसाठी प्रसिद्ध असणारे शहर.
माझ्या हॉटेलपासून टोकियो ला जायला जवळपास २ तास लागतात. इकडच्या चांगल्या रेल्वे सर्विस मुळे सुसह्य असतो प्रवास.
टोकियो रेल्वे स्टेशन खूप बिझी स्टेशन आहे. दिवसाला जवळपास ३००० गाड्या धावतात. तेथून जवळच इंपीरीयल पॅलेस आहे.
टोटल एरिया 3.41 स्क्वेर किलोमीटर्स आहे. पॅलेस जवळच्या बागेमध्ये दुपारी १-२ वाजता लोक जोग्गिंग करत होते.ती बाग एवढी मोठी आहे कि एक पूर्ण फेरफटका मारला कि
वजन नक्की १-२ किलो कमी होणार.आम्ही चालून थकलो. लोक पळून कसे थकत नाहीत....
तिकडे पोहोचल्यावर पाऊस सुरु झाला. मला वाटले गेला आता सगळा प्रवास फुकट..
परंतु पाऊस लगेच थांबल्याने जरा हायसे वाटले.
पॅलेस पाहून आम्ही पुढे टोक्यो टॉवेर् पाहायला गेलो.हा टॉवेर् आईफेल टॉवेर् पेक्षा उंच
आणि वजनाला हलका आहे (अर्थात जपानी माणसांवर विश्वास असल्याने मी उचलून खात्री केली नाही.) टॉवेर् अंधे १५० आणि २५० फूट पर्यंत जाऊन टोकियो दर्शन
घेता येते आणि खरेदी पण करता येते ( टॉवेर् खरेदी नाही.) माझ्या सोबतच्या एका सहयोग्याने गांधी बाबांसारखे गोल आणि साखळी असलेले घड्याळ विकत घेतलेले पाहून
मला गम्मत वाटली. कारण त्याने ते त्याच्या भारतातील कारमध्ये लटकावयाला घेतले आणि मला विचार पडला कि मग जपान मधून विकत घेऊन फायदा काय? कारण ते तर आपल्याकडे पण मिळते आणि
त्या घड्याळात जपानी वाटण्यासारखे काहीहि नव्हते...असो...
इतक्या उंचीवर जाऊन टोकियो शहर पहिले पण आजूबाजूचे लोक जेवढे आ वासून कौतुक करत होते तेवढेच मी शांत होते. कारण मला असल्या गोष्टी फारश्या आकृष्ट करत नाहीत. त्यापेक्षा मला
मैसूर मधील चामुंडा हिल्स वरून दिसणारे मैसूर शहर आणि त्यांचा राजवाडा जास्त विलोभनीय वाटतो (हे माझे मत आहे. तुम्हाला वेगळी मते असू शकतात.) कारण त्या टॉवेर् वरून आजूबाजूला उंच उंच इमारती सोडल्यातर
फार काही विशेष दिसत नाही.
इथे सध्या स्काय ट्री चे खूप वेड आहे.त्याची उंची ६३४.० मीटर आहे.टोकियो मधील उंच इमारतींमुळे टी.व्ही., मोबाईल साठीच्या रेडियो लहरींचे नीट प्रक्षेपण होत नसल्याने याची निर्मिती करण्यात आली.
टॉवेर् पाहून परत येत असताना एका मॉल मध्ये गेलो. तिथे संगीताचा लाईव्ह शो सुरु होता. जपानी संगीत त्यांच्या सारखेच शांतताप्रिय वाटले.२ मुली बासरी वाजत होत्या आणि त्यांना साथ देणारा जपानी समुदाय.
कॉफी घेत असे कर्णमधुर संगीत ऐकताना जपानी समाजाच्या आणखीन एका पैलूचे दर्शन घडले.
....................अस्मित [२५ ऑक्टो २०१२ जपान]

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२

अंतरीच्या वादळाने
मन सुटं सुटं केले
तुझ्या मायेच्या हातांनी
त्याला सावरून धरले.

नव्हता आधार कुणाचा
निजेचा बाजही वेगळा
मायेने आणले जगात
बाप मात्र नामानिराळा.

जात तिच्याच पदराची
भोळा [?]समाज विचारे
वाटा तिच्याच कर्तृत्वाचा
मग ओरबाडू पाहे.

आता इतुकेच ठावे
जगायाचे हमखास
पुन्हा एकदा करायची
या जगासोबत उठबस.
............अस्मित

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२




माझी जपान सफर - ४
आम्हाला ज्या हॉटेल मध्ये राहायला खोली दिली होती ते बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशन पासून १-२ मिनटांच्या अंतरावर आहे.
पण जपानी माणसाच्या गाडीचे हॉर्न्स अजिबात न वापरण्याच्या सवयी मुळे आणि रूम व्यवस्थित साउंड प्रूफ असल्याने मला आवाजाचा त्रास अजिबात जाणवत नाही.
खरेतर इथे आवाजाचा कसला त्रासच नाही. येथील लोक चुकून किंवा टाइमपास म्हणून देखील हॉर्न वाजवत नाही. आवाज फक्त आला तर ambulance चा
[नोट :  आपल्याकडील लोकांनी जपान मध्ये गाडी चालवण्या आधी विचार करावा...जपान कि हॉर्न?]
सगळीकडे रस्त्याने पाट्या वाचता येतील अश्या लावलेल्या. कुठेही रस्त्यात कागद, कचरा अथवा झाडाची पाने सुद्धा पडलेली दिसत नाहीत.
परंतु त्यांच्या एवढ्या स्वच्छतेमुळे बिचारे पाऊस पडल्यावर येणारा "मातीचा सुगंध" काय आणि कसा असतो या स्वर्गीय अनुभवला मुकले [आम्ही भारतीय सुदैवी, कारण आमच्या पायाला अजूनही माती आहे :) ]
इथला पाऊसही मजेशीर आहे. बिचारा दिवसभर पडतो पण कोसळणाऱ्या पावसाचे सुख देत नाही. तोही जपानी माणसा सारखा पद्धतशीर. या पावसात भिजण्याचा खरा आनंद नाही :(
पाऊस कसा मस्त कोसळणारा आणि सगळी मरगळ उतरवून कांदा भजी आणि अर्धा चहाची तल्लफ जागवणारा हवा, तेहि कळकुटट टपरी आणि फुटका रेडियो सोबतच.
इकडच्या हॉटेल मधील रूम खूपच छोट्या असतात. म्हणजे त्या जपानी लोकांच्या दृष्टीने स्टॅंडर्ड असल्या तरी आपल्यासाठी न्हाणीघरा एवढ्याच असतात.
आमच्या ऑफीस लोकांनी आम्हाला वेलकम पार्टी दिली. आम्ही आधीच सांगितले होते कि आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत त्यामुळे आम्ही एका भारतीय रेस्टोरेंट मध्ये जेवायला गेलो.
[जपान मधील लोकांना शाकाहारी म्हणजे की हेच मुळी माहित नाही, त्यामुळे पूर्ण शाकाहारी दूरच राहिला :)]ते रेस्टोरेंट अर्धे भारतीय अर्धे जपानी आहे, सगळे जेवण नुसते गोड.एकही पदार्थाला झणझणीत चव नाही. पण जपानी लोक सोबत असल्याने त्यांच्या सोयीनुसार जेवण मागवले.जपानी लोक भारतीय जेवण आवडीने खातात. त्यांच्यासाठी ते जेवण तिखटच असते, तरी खूप सारे लोक सुट्टीच्या दिवशी वगैरे येथे येऊन भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात.[जपान मध्ये खूप सारी भारतीय रेस्टोरेंट आहेत. ]
आम्ही ज्या रेस्टोरेंटमध्ये जेवलो तेथील लोक खूपच चांगले होते. सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत होते. आम्ही ऑर्डर देत असताना त्याने जपानी लोकांना आधी सांगून ठेवले कि तुम्ही ऑर्डर केलेले खूप जास्त होईल, नीट विचार करून मागवा, तरीही जे ह्वायचे ते झाले.या लोकांनी निम्म्याहून जास्त जेवण वाया घालवले. :( असो...
ऑफीस मध्ये पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणात खूप गम्मत झाली. आमच्या साठी शाकाहारी जेवण शोधता शोधता धावपळ करावी लागली. शेवटी ऑफीस बाहेर मोबाईल गाडी मधून मिळणार एशिअन करी "ग्रीन करी" [भात आणि आमटी] घेतला, जपानी चिकट भात आणि आल्याची आमटी असा जेवण घेतल्यावर उद्यापासून घरूनच डब्बा न्यायचे मनाशी पक्के केले.
इकडे ब्रेड आणि केक चे असंख्य वेगळे प्रकार पाहायला मिळतात. आणि ते खरेच खूप छान लागतात. यांच्या कडील साखर आपला सारखी गोड नसते. त्यामुळे इकडचे गोड पदार्थ आपल्या सारखे तसे गोड नसतात.
दुकानातून सगळे पदार्थ खूप सुंदर सजवले असतात. अगदी मांस मच्छी न खाणार्याला हि मोह होऊ शकतो घ्यायचा.
इकडचा माणूस नकाशात जगतो असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कुठेही जा हातात नकाशा असणारच [आता आय फोन ]. कोणावरही अवलंबून राहायचे नाही. बाहेरून आलेल्या लोकांना स्वखर्चाने नकाशाची प्रिंट काढून देणार आणि कसे जायचे ते पद्धतशिरपणे आणि अगदी किती वेळ लागेल सगळ सांगणार. बाहेरील माणसाला झालेला त्रास त्यांना पाहवत नाही आणि कोणाला त्रास देववत नाही.
जपान मध्ये शेत जमीन खूप कमी, त्या मुळे शेतीच्या बाबतीत भरपूर संशोधन करून या लोकांनी हायब्रीड पिके बाजारात आणलीत. भले थोरले मुळा, कांदे,बटाटे,सफरचंद पाहून त्यांची कीव करावी कि कौतुक कळत नाही.
..........................................................अस्मित [१९  ऑक्टो २०१२ जपान]

माझ्या मातीची भूल
पडे त्या ईश्वराला,
गंध मधाळ कस्तुर
कणा कणात विसावला
.........................................: अस्मित






माझी जपान सफर - ३

शेवटी एकदाच मी ७ ऑक्टो ला सकाळी ११:३० ला जपानला पोहोचले. माझी कानागावा ला जाण्याची बस २ तासाने होती आणि टोकियो पासून २ तासाचा बस प्रवास होता.
एरपोर्टवर २ तास काढायचे होते. जपान हे शहर काय आहे याची कल्पना यायला वेळ लागला नाही.अप्रतिम स्वच्छ, सगळे व्यवहार शांत कानी काटेकोर पणे.
कुठेही चिडचिड, वैताग नाही. अडल्यास कोणालाही मदत मागावी, अगदी स्वतः ची कामे सोडून रस्ता दाखवायला आपल्या स
ोबत येणार.
कमालीचे ऑटोमायज़ेशन.खरेच खूप कौतुक वाटते या राखेतून वर आलेल्या देशाचे.
बस मधून जाताना टोकियो चे दर्शन घेत आम्ही एकदाचे कानागावाला पोहोचलो तेव्हां संध्याकाळचे ४ झाले होते.या लोकांनी त्यांची टेक्नॉलॉजी एवढी जबरदस्त विकसित केली आहे
कि आपण हॅरी पॉटर च्या राज्यात आल्यासारखे वाटते. सगळ्या बस, रेल्वे एअरकन्डीशण्ड, सगळे नियम ठरलेले आणि पाळले जाणारे. रस्ता ओलांडताना, बस रेल्वेत चढताना, दुकानातून
सगळे जन रांगेत उभे राहतात (नशीब अमिताभ इथे जन्माला नाही, बिचारा रांगेत उभे राहावेच लागले असते त्याला :P). रात्री ३ ला जरी रस्ता ओलांडायचा असेल तरी सिग्नल पडायची वाट पाहत रांगेत उभे राहणार.
रस्ता झेब्रा क्रोस्सिंग वरूनच ओलांडणार.
इथे धूळ, चिखल, कचऱ्याचा सुगंध(?), रस्त्यावर भटकणारी कुत्री मांजरी, गायी म्हशी रस्त्यात चरत बसलेल्या इतकच काय पण शेताच्या कडेला कोणी टमरेल घेऊन बसलेला असल काही अनुभवला मिळत नाही.
कचरा टाकण्याचे नियम आणि दिवस ठरलेले. ऑफिस मध्ये पण तसच, कचरा टाकायला एक वेगळी रूम;आणि ती पण दुर्गंधी विरहित. प्लास्टिक,कागद,बाटल्या,कॅन्स, पेपर सगळ्या साठी वेगळ्या कचरा पेट्या.
बाथरूम मधीलच पाणी पिण्या इतपत चांगले.कुठेही कसले घाण वास नाही. बहुतेक सगळ्या घरांभोवती छोटी पण आखीवरेखीव बाग. पण पक्षी दर्शन मात्र कमीच.
इथे लोक मॉल्स मधून पाळीव प्राणी विकत घेताना दिसतात. ती कुत्री,मांजरे दिसायला क्यूट असतात पण जिवंत पणाचा अनुभव येत नाही. नुसतीच फरची खेळणी चावी दिल्या सारखी वाटतात.
इथल्या फॅशन बद्दल बोलावे तेवढे कमीच. अमेरिकन संस्कृतीचा खूप पगडा. इथे डोळ्याच्या पापण्यासाठी वेगळे ब्युटीपार्लर्स पाहून थक्क झाले.इथल्या मुलींना पापण्या रंगवणे, खोटी नखे लावून ती सजवून घेणे याचे खूप वेड आहे. सामान्यत: सगळ्या मुली रोजच खूप नट्टा पट्टा करून आणि एकदम तोकडे कपडे (भर थंडीतही) वापरणाऱ्या आहेत.
इथे लोक एकमेकांशी खूपच कमी संवाद साधताना दिसतात. सगळे सतत हातात मोबाईल, पुस्तक नाहीतर गाणी ऐकण्याची साधने घेऊन असतो. मग ते बस साठी वाट पाहत असोत, अथवा सायकल चालवत असोत, त्यांचे मोबाईल प्रेम काही कमी होत नाही.
...............................................................अस्मित [१८ ऑक्टो २०१२ जपान]

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२




माझी जपान सफर - २
सृष्टी मध्ये बहु लोक, परिभ्रमणे काळे कौतुक - समर्थ [पु.ल. च्या पूर्वरंग पुस्तकातून साभार]
इतके वर्ष नुसत विचारातून पाहिलेला, हिंडलेला देश पाहायला मी जाणार होते.
आधी महिनाभर नुसत जाणार कि नाही यावरून हृदयाचे ठोके ऑलिम्पिक मध्ये धावल्या सारखे होते होते, आणि खरेच जायची वेळ आली तेव्हां अतिहर्षाने
आपण विमानाऐवजी स्वत:च उडून जातोय कि काय असे वाटू लागले.
असो..तर एकदाची जाण्याची वेळ, तारीख ठरले. मी(?) प्रवासाला(?) (ते हि एवढ्या लांबच्या :P) निघणार म्हणल्यावर सगळ्यांना सत्रांदा फोनाफोनी करून मी जातेय, बॅग कोणती आणि कितीची घेऊ, काय काय समान घेऊन जाऊ, तिकडे थंडी असेल कि पाऊस, विमानाची वेळ, बॅगेचे वजन इ. इ. सगळे करून झाले.
माझ्या वैद्यांनी पण तीन महिन्यांची औषधे देऊन माझ्या बॅगेचे आणि स्वतःच्या खिशाचे वजन थोडे आणखीन वाढवले.
सरते शेवटी जाण्याची वेळ झाली आणि घरापासून विमानतळा पर्यंत पोहोचवणारी (दोन्ही अर्थाने पोहोचवणारी, कारण चेन्नई मधील सगळे ड्राईव्हर F1  मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत ) कॅब आलीच नाही आणि मी अजूनही भारत देशात असल्याचे तत्काळ ज्ञान त्यांनी मला करून दिले.
मग त्यांच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार करत आम्ही आपल्या ३ चाकीने म्हणजे रिक्षाने निघालो.विमानतळावरील सगळे सोपस्कार आटोपून आमचे श्रीलंकेचे विमान चक्क वेळे आधी उडाले. रावण वधा नंतर भारतीय लोकांचा त्यांनी धसका घेतला असावा बहुतेक. भारताचा राष्ट्रीय पक्षी विमान सुंदरींच्या साडीवर दिमाखाने मिरवत होता आणि चेहऱ्यावर गोड हसू ठेवून "Ayubowan!" ("अयुबोवन" (सिंघाली भाषेत अर्थ "भरपूर वर्ष जागा") अस म्हणत सगळ्यांचे स्वागत करत होत्या. आता विमानाने प्रवास करत असताना "भरपूर वर्ष जागा" अस म्हणून स्वागत करण्यामागचे कारण मला समजले नाही.कदाचिद आपल्या बंधू भावांच्या विमाने उडवण्याच्या खेळाचा त्यांना खूप आदर असावा.असो..
श्रीलंकेत कोलोम्बो ला उतरलो. तेथून टोकियो ला जाणार्‍या दुसर्‍या विमानात बसायचे होते. श्रीलंकेचा विमानतळ खूपच सुंदर आहे. तिथे गौतम बुद्धाची मोठी आणि छान मूर्ती आहे. १ तासाने टोकियो च्या विमानात बसलो. माझ्या शेजारी ३ जपानी स्त्रिया होत्या, त्यातील दोघीजणी विमान सुरु होण्याआधीच कुठे गेल्या त्या परत आल्याच नाहीत. रात्रीचे ११:३० झाले होते, मग मी आणि ती उरलेली जपानी बाई चक्क शेजारील सीट वर पाय पसरून भारतीय रेल्वेत असल्यासारखं आडवे होऊन झोपून गेलो ते थेट सकाळीच उठलो. कुठेहि जा मला आपण भारतीय असल्याचा पूर्ण अभिमान आहे.
..................................अस्मित [१७ ऑक्टो २०१२ जपान]
माझी जपान सफर-१

झाले....एकदाचे स्वप्न साकार झाले....
कोणते...????
अहो हेच की....उगवत्या सूर्याच्या देशात येण्याचे...."जपान" ला येण्याचे स्वप्न.
अगदी लहापणापासून (म्हणजे नक्की कधी पासून माहित नाही :) ) जपान बद्दल आकर्षण होते.
कदाचिद दर रविवारी दूरदर्शनवर लागणाऱ्या "रंगोली" या कार्यक्रमामध्ये लागणाऱ्या "सायोनारा सायोनारा" किंवा "ले गायी दिल गुडिया जपान कि" या गाण्यांमध्ये
त्याचे मूळ लपलेले असणार...:)
पण इतके वर्षांच्या प्रतीक्षा नि तपश्चर्येनंतर माझ पाऊल एकदाच जपान मध्ये पडले.
इथे येण्याधीची उत्सुकता, थोड टेन्शन, आपला कसे होईल तिथे...अशी वाटणारी काळजी (मला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा :) )सगळे काही भरून पावल्या सारखे झाले.
कॉलेजमध्ये शिकत असताना जपानशी थोडातरी संबंध यावा म्हणून मुद्दाम "Total Quality Management" हा विषय स्पे. म्हणून निवडला.
आमच्या बॅचमुळे हा विषय कॉलेजमध्ये सुरु करावा लागला, आणि श्री. देव सरांच्या कृपेमुळे जपान आणि त्यांचे Quality प्रेम खूप चांगले शिकायला मिळाले.
 काय आहे असे जपान कडे कि बरेच लोक त्या देशाकडे आकर्षित होतात....त्यांची टेक्नोलॉजी,क्वालिटी वर्क, क्रिएटिविटी,हॉस्पिटालिटी, निसर्गप्रेम......आणखीन बरेच काही...सगळेच ग्रेट.
खरेतर पु.ल. देशपांडे आजोबांनी त्यांच्या लिखाणातून या देशाबद्दलचे प्रेम अजूनच वाढवले. त्यांना भावलेला जपान खरोखर तसाच आहे.....खूप गोड माणसे आणि तसेच गोड आदरातिथ्य...

सध्या इथे ऑटम सिझन आहे.आपल्यासाठी थंडी वाटत असली तरी जपानी माणूस या ऋतूची खूप आतुरतेने वाट पाहतो.  नोव्हेंबर पासून इथे झाडाची पाने लाल किंवा गोल्डन येलो रंगाची होतात.
सगळा निसर्ग रंगात न्हावून निघतो.आम्ही इथे आल्यावर सगळ्या जपानी माणसांची हीच प्रतिक्रिया होती कि आम्ही अगदी योग्य वेळी जपानला आलो :)
चला...उशिरा का होईना पण कोणाला हातपाय न पडता, चापलुसी न करता (न शिक्षकांची, न मॅनेजरची) स्वकष्टाने आणि मित्रमंडळाच्या सहकार्याने, घरच्यांच्या पाठबळाने आणि परमेश्वराच्या कृपार्शिवादाने
येथवर येऊन पोहोचले.आता मागे वळून गेले ६ वर्षांचा आढावा घेतला तर सगळे कष्ट, दुख: सगळ भरून पावल्याचे समाधान मिळते .काही लोकांनी मित्र म्हणून केलेली फसवणूक, आजारी असताना पण ऑफीसमध्ये करायला लावलेली कामे इ. , सगळ काही पाउस पडून गेल्यावर आकाश आणि धरणी स्वच्छ करत तसेच वाटल.
मी जपानला जाणार हे ऐकल्यावर लोकांना झालेला आनंद आणि काहीना झालेली इर्षा, काहींचे आरोप कि मी बदलले, गर्व चढला आणि तर काहींना वाटणारे संशयमिश्रित आश्चर्य....सगळ तेवढ्याच नम्रतेने स्वीकारलं.
कारण ज्यांनी माझे कष्ट पहिले त्यांना माझ्या यशात आणि आनंदात सहभाग घेतला, उरलेल्या इतरांना माझ्या आयुष्यात फार काही स्थान नाही; मग त्यांना काय वाटते याचा कोणाला फरक पडतोय.
मी आनंदी आहे, सुखात आहे. अजून काय सुख हवे?

.....................................................................अस्मित (16th Oct Japan)
To be conti.......

फेसबुक ने सारे जग जवळ आणले

फेसबुक ने सारे जग जवळ आणले
म्हातारे चेहरे षोडशवर्षीय झाले.
स्वातंत्र्याचा खरा अर्थ स्वैराचार झाला.
वान्ग्मय चौर्‍याने खर्या कवींना फासावर लटकवला.
आजोबांना आता "नमस्कार आजोबा" नको वाटू लागल,
"हाय / हेलो डियर"ने संभाषण सुरू झाल.
प्रत्येकजण इथे दुसर्याला "स्वतःची"काळजी घ्यायला सांगत,
खरे सांगा, इथे कोण "दुसर्‍याची" चिंता वाहत.......?
बायकांचे कमी वय अजुनच कमी झाले,
बेडरूममधील हितगुज भिंतीवर आले.

आता सगळे जणफक्त एकच काम करू
दिवसातून एक मिनिट तरी घरच्यांसाठी बोलू.
......................................................................अस्मित [जपान मधून पहिली कविता :)]